“पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता राहिलेला नाही” - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, August 21, 2026

“पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता राहिलेला नाही”

 “पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादीचा बालेकिल्ला होता, आता राहिलेला नाही”


 पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा दावा

सोलापूर (कटूसत्य वृत्त):- “एकेकाळी पश्चिम महाराष्ट्र हा राष्ट्रवादी काँग्रेसचा अभेद्य बालेकिल्ला मानला जात होता. मात्र, बदलत्या राजकीय परिस्थितीत हे चित्र आता बदलले असून पश्चिम महाराष्ट्रात भाजपची ताकद मोठ्या प्रमाणात वाढली आहे,” असा दावा राज्याचे ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केला. भाजपची पश्चिम महाराष्ट्र विभागीय संघटनात्मक बैठक गुरुवारी सोलापुरातील होटगी रोडवरील हॉटेल बालाजी सरोवर येथे पार पडली. बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी हा दावा केला.

या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पश्चिम महाराष्ट्रातील पक्षाचे प्रमुख नेते, आमदार, जिल्हाध्यक्ष, पदाधिकारी आणि संघटनात्मक जबाबदारी सांभाळणारे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. आगामी निवडणुका, मतदार नोंदणी मोहीम, विशेष सखोल पुनरिक्षण (SIR) प्रक्रिया आणि पक्ष विस्तार यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

भाजपच्या पश्चिम महाराष्ट्र विभागीय बैठकीत आगामी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुका लक्षात घेऊन मतदार नोंदणी वाढविण्यावर विशेष भर देण्यात आला. या निवडणुकांमध्ये पक्षाची ताकद वाढविण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना पदाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचे समजते.

तसेच सध्या सुरू असलेल्या एसआयआर (Special Intensive Revision) प्रक्रियेचा आढावाही बैठकीत घेण्यात आला. मतदार याद्यांची पडताळणी, नव्या मतदारांची नोंदणी आणि अपात्र नोंदींबाबत कार्यकर्त्यांनी सक्रिय राहण्याचे आवाहन करण्यात आले.

माध्यमांशी बोलताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पश्चिम महाराष्ट्रातील बदलत्या राजकीय परिस्थितीवर भाष्य केले. सहकार, साखर कारखाने आणि स्थानिक राजकारणाच्या माध्यमातून अनेक वर्षे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रभाव राहिला होता. मात्र, लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपले अस्तित्व मजबूत केले असल्याचा दावा त्यांनी केला.

“आज पश्चिम महाराष्ट्रात भाजपची संघटना सक्षम झाली आहे. कार्यकर्त्यांचे जाळे वाढले आहे आणि पक्षाला लोकांचा प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे एकेकाळी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जाणारा हा प्रदेश आता बदलत आहे,” असे गोरे यांनी सांगितले.

बैठकीत आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुका तसेच भविष्यातील राजकीय रणनीती यावरही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. प्रत्येक जिल्ह्यात पक्षाची संघटनात्मक ताकद वाढविणे, बूथस्तरावर कार्यकर्त्यांचे जाळे अधिक सक्षम करणे आणि मतदारांशी थेट संपर्क वाढविण्यावर बैठकीत भर देण्यात आला.

प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनीही कार्यकर्त्यांना संघटनात्मक दृष्ट्या अधिक सक्रिय राहण्याचे आवाहन केले. आगामी निवडणुकांमध्ये पश्चिम महाराष्ट्रात अधिकाधिक जागा जिंकण्यासाठी नियोजनबद्ध पद्धतीने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे समजते.

दरम्यान, भाजपची विभागीय बैठक सुरू असतानाच विधिमंडळ अंदाज समितीचे २७ आमदार याच हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याने हॉटेल बालाजी सरोवर परिसराला दिवसभर ‘व्हीआयपी’ स्वरूप प्राप्त झाले होते. विविध जिल्ह्यांतील लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीमुळे परिसरात राजकीय चर्चांना उधाण आले होते.

पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय समीकरणे झपाट्याने बदलत असताना भाजपने संघटनात्मक पातळीवर जोरदार तयारी सुरू केल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या विधानामुळे पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात नव्या चर्चांना तोंड फुटण्याची शक्यता आहे.
या बैठकीत मंत्री चंद्रकांत पाटील, प्रदेश सरचिटणीस आ. निरंजन डावखरे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, SIR महाराष्ट्र प्रभारी भगवानदास सबनानी, SIR प्रदेश संयोजक डॉ. किरीट सोमय्या, माजी मंत्री आमदार सुरेश खाडे, आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार महेश लांडगे, विजय देशमुख, आमदार राणाजगजितसिंह पाटील, आमदार राजेंद्र राऊत, ज्येष्ठ नेते माजी आमदार राजन पाटील, माजी आमदार यशवंत माने, आमदार देवेंद्र कोठे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार समाधान आवताडे, आमदार धैर्यशील कदम, खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार मनोज घोरपडे, आमदार राहुल कुल, माजी आमदार संजय जगताप, आमदार सिद्धार्थ कांबळे, प्रदेश सचिव राम सातपुते, युवा मोर्चा भाजपा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, सोलापूर भाजपा अध्यक्ष शशिकांत नाना चव्हाण, सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. सौ. प्रियाताई महेश शिंदे, सोलापूर जिल्हा परिषद शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार-सावंत, लोकनेते शुगरचे चेअरमन बाळराजे पाटील, सिनेट सदस्य अजिंक्यराणा पाटील, सोलापूरचे महापौर विनायक कोंड्याल, सोलापूर भाजपा शहराध्यक्ष रोहिणीताई तळवळकर यांच्यासह पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख आमदार, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages