सुब्रोतो कप फुटबॉल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूलची चमकदार कामगिरी
सोलापूर, (कटूसत्य वृत्त):- वालचंद महाविद्यालय, सोलापूर येथे २१ व २२ जुलै २०२६ रोजी झालेल्या प्रतिष्ठेच्या सुब्रोतो कप आंतरशालेय फुटबॉल स्पर्धेत सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगावच्या विद्यार्थ्यांनी दमदार खेळाचे प्रदर्शन करत उल्लेखनीय यश संपादन केले. १७ वर्षांखालील मुलांच्या गटात उपविजेतेपद, तर १५ वर्षांखालील गटात तृतीय क्रमांक पटकावत शाळेच्या नावलौकिकात मानाचा तुरा रोवला.
१७ वर्षांखालील गटात सिंहगडच्या संघाने संपूर्ण स्पर्धेत आक्रमक व शिस्तबद्ध खेळाचे प्रदर्शन केले. उपांत्य फेरीत के.बी.पी., पंढरपूर संघाचा २-० असा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात आयएमएस, अक्कलकोट संघाविरुद्ध चुरशीची लढत झाली. अखेर स्पर्धेतील सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर सिंहगडच्या संघाने उपविजेतेपदावर नाव कोरले.
१५ वर्षांखालील गटात तृतीय क्रमांकासाठी झालेल्या सामन्यात सिंहगड पब्लिक स्कूलने आयएमएस, अक्कलकोट संघावर १-० असा रोमांचक विजय मिळवत तृतीय क्रमांक पटकावला. संघातील खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य, शिस्त, चिकाटी आणि सांघिक खेळाचे दर्शन घडवून उपस्थितांची दाद मिळवली.
विद्यार्थ्यांच्या या यशामागे त्यांची अथक मेहनत, प्रशिक्षकांचे प्रभावी मार्गदर्शन, पालकांचे सहकार्य आणि शाळेने उपलब्ध करून दिलेल्या दर्जेदार क्रीडा सुविधांचा मोठा वाटा असल्याचे गौरवोद्गार व्यक्त करण्यात आले.
या यशाबद्दल सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव कॅम्पसचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले यांनी विजयी खेळाडू, संघाचे प्रशिक्षक व क्रीडाशिक्षक राजू ठाकूर यांचे अभिनंदन केले. भविष्यातही राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धांमध्ये अशीच उल्लेखनीय कामगिरी करून शाळेसह सोलापूर आणि महाराष्ट्राचे नाव उज्ज्वल करावे, अशा शुभेच्छाही त्यांनी दिल्या.
यावेळी प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, पालक आणि विद्यार्थ्यांनीही यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन केले.
सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये शैक्षणिक गुणवत्तेसोबतच क्रीडा, सांस्कृतिक आणि सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला विशेष प्राधान्य दिले जाते. नियमित सराव, आधुनिक प्रशिक्षण आणि विविध स्पर्धांमधील सहभागामुळे शाळेचे विद्यार्थी जिल्हा, राज्य व राष्ट्रीय स्तरावर सातत्याने उल्लेखनीय यश संपादन करत असून, सुब्रोतो कपमधील ही कामगिरी त्या यशस्वी परंपरेतील आणखी एक अभिमानास्पद पर्व ठरली आहे.
.png)
No comments:
Post a Comment