बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, August 6, 2026

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती

बालक निरोगी तर भविष्य सुरक्षित’; कुशल जैन यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य तपासणीला गती



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- बालक निरोगी तरच भविष्य सक्षम! या उद्देशाने राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाची अंमलबजावणी अधिक प्रभावी करण्यावर सोलापूर जिल्हा परिषदेने भर दिला आहे. एकही बालक आरोग्य तपासणी व आवश्यक उपचारांपासून वंचित राहू नये, त्याचे वेळेत निदान होऊन तातडीने उपचार मिळावेत, यासाठी आरोग्य आणि शिक्षण विभागाने समन्वयाने काम करण्याच्या सूचना मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.
आरोग्य, शिक्षण व  राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीचा तसेच उपचार व शस्त्रक्रियांचा आढावा घेण्यात आला. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी CEO कुशल जैन होते.

सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत 52 आरोग्य पथके कार्यरत आहेत. या पथकांमार्फत अंगणवाडीतील 0 ते 6 वर्षे आणि शाळांमधील 7 ते 18 वर्षे वयोगटातील बालकांची आरोग्य तपासणी केली जाते. तपासणीत आढळणाऱ्या जन्मजात व्यंग, पोषणमूल्यांची कमतरता, शारीरिक व मानसिक विकासातील विलंब तसेच विविध आजारांचे निदान करून आवश्यकतेनुसार उपचार व संदर्भ सेवा उपलब्ध करून दिली जाते.
जून-जुलै 2026 पर्यंतच्या आकडेवारीनुसार, अंगणवाडी स्तरावर जिल्ह्यातील 2 लाख 69 हजार 516 बालकांच्या उद्दिष्टापैकी 1 लाख 99 हजार 644 बालकांची आरोग्य तपासणी पूर्ण झाली आहे. तर शाळा स्तरावर एप्रिल 2026 पासून आतापर्यंत 72 हजार 77 विद्यार्थ्यांची तपासणी करण्यात आली आहे.
हृदयविकाराच्या बालकांना मिळाले नवजीवन
राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत गंभीर आजार असलेल्या बालकांना उपचारासाठी संदर्भित करून आवश्यक त्या शस्त्रक्रिया उपलब्ध करून दिल्या जात आहेत. सन 2026-27 मध्ये हृदयशस्त्रक्रियेसाठी ओळख पटलेल्या 39 हृदयशस्त्रक्रिया मुंबई येथे 11 ऑगस्ट ला मोफत करण्यात येणार आहे.
बैठकीस जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा डोईफोडे, शिक्षणाधिकारी (प्रा.) कादर शेख, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहाय्यक संचालक कुष्ठरोग डॉ. मोहन शेगर, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव, निवासी वैद्यकीय अधिकारी (बाह्य संपर्क) डॉ. श्रीकांत कुलकर्णी, प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना अधीक्षक मयुर पाटील, आदी उपस्थित होते.
बालकांच्या आरोग्याची तपासणी केवळ कागदावर न राहता, तपासणीत आढळलेल्या प्रत्येक आजाराचे निदान, उपचार आणि आवश्यक शस्त्रक्रिया पूर्ण होईपर्यंत त्याचा पाठपुरावा करण्यावर प्रशासनाचा भर आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी मत व्यक्त केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages