झेडपीच्या ३६ शाळा महापालिकेला देणार नाही; उपाध्यक्ष पवार, सभापती केदार यांची ठाम भूमिका
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्हा परिषदेच्या अधिपत्याखालील ३६ शाळा यू-डायस (U-DISE) प्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या लॉगिनवर दिसू लागल्याने शाळांच्या हस्तांतरणाबाबत निर्माण झालेल्या संभ्रमावर जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. कोणत्याही परिस्थितीत जिल्हा परिषदेच्या शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होऊ दिल्या जाणार नाहीत. या शाळा जिल्हा परिषदेच्याच राहतील आणि त्यांच्यासाठी आवश्यक सर्व सुविधा जिल्हा परिषदेकडूनच उपलब्ध करून दिल्या जातील, असे त्यांनी स्पष्ट केले.
शहर हद्दीतील जिल्हा परिषदेच्या ३६ शाळा यू-डायस प्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या लॉगिनशी संलग्न झाल्याची माहिती समोर आल्यानंतर शिक्षण क्षेत्रात विविध चर्चांना उधाण आले होते. तसेच जिल्हा परिषदेच्या कोट्यवधी रुपयांच्या मालमत्तेबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत होते.
यासंदर्भात प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, संबंधित शाळा सोलापूर महानगरपालिका हद्दीत असल्याने माहिती संकलनाच्या उद्देशाने त्या तात्पुरत्या स्वरूपात यू-डायस प्रणालीमध्ये महानगरपालिकेच्या लॉगिनशी जोडण्यात आल्या आहेत. हा केवळ तांत्रिक बदल असून काही दिवसांत तो पूर्ववत करण्यात येणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, महानगरपालिका हद्दीतील जिल्हा परिषद शाळांच्या हस्तांतरणाचा विषय यापूर्वीही अनेकदा चर्चेत आला होता. त्यावेळी जिल्हा परिषदेकडून इमारती आणि जागेचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय कोणतेही हस्तांतरण होणार नसल्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. त्यानंतर हा विषय प्रलंबितच राहिला आहे.
या पार्श्वभूमीवर उपाध्यक्ष इंद्रजित पवार आणि शिक्षण समितीचे सभापती चेतनसिंह केदार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केले की, जिल्हा परिषदेच्या सभागृहाची मंजुरी आणि सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्याशिवाय कोणतीही शाळा महानगरपालिकेकडे हस्तांतरित होऊ शकत नाही. त्यामुळे पालक, विद्यार्थी आणि शिक्षकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन त्यांनी केले.
No comments:
Post a Comment