गाजावाजा कृषी दिनाचा; योजनांचा मात्र बोजवारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, July 3, 2026

गाजावाजा कृषी दिनाचा; योजनांचा मात्र बोजवारा

 गाजावाजा कृषी दिनाचा; योजनांचा मात्र बोजवारा

कृषी विभागातील ८,९५३ पदे रिक्त; शेतकऱ्यांच्या पदरी अडथळ्यांचीच शर्यत




सोलापूर (कटूसत्य वृत्त) : राज्यात दरवर्षी १ जुलै रोजी कृषी दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. मात्र, शेतकऱ्यांपर्यंत शासकीय योजना प्रभावीपणे पोहोचविणाऱ्या कृषी विभागातच मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची कमतरता असल्याचे वास्तव समोर आले आहे. सोलापूरसह संपूर्ण राज्यात कृषी विभागातील तब्बल ८ हजार ९५३ पदे रिक्त असल्याने योजनांच्या अंमलबजावणीचा वेग मंदावला असून अनेक शेतकरी शासकीय लाभापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.

उपलब्ध माहितीनुसार, राज्यातील कृषी विभागात मंजूर असलेल्या ३९ हजार ५१७ पदांपैकी केवळ ३० हजार ५६४ पदे भरलेली असून ८ हजार ९५३ पदे म्हणजेच २२.६५ टक्के पदे रिक्त आहेत. निर्णय प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका असलेल्या वर्ग 'ब' (राजपत्रित) अधिकाऱ्यांची ३१.३७ टक्के पदे रिक्त आहेत. तर गावपातळीवर शेतकऱ्यांशी थेट संपर्क ठेवणाऱ्या वर्ग 'क' संवर्गातील कृषी सहायक आणि कृषी तंत्रज्ञांची तब्बल ५ हजार १६ पदे रिक्त असल्याने शेतकऱ्यांना प्रत्यक्ष शेतात जाऊन मार्गदर्शन करणेही अनेक ठिकाणी शक्य होत नसल्याचे चित्र आहे.

रिक्त पदांमुळे अनेक कर्मचाऱ्यांवर दोन ते तीन कार्यालयांचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. परिणामी कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार, शेतशिवार भेटी, पीक पाहणी आणि मार्गदर्शन यांसारखी मूलभूत कामे मागे पडत आहेत. कर्मचारी पीक विमा पडताळणी, ई-केवायसी, ऑनलाइन अर्ज मंजुरी, पीक नुकसानभरपाई पंचनामे, बँक खाते जोडणी आणि अन्य प्रशासकीय कामांमध्येच अडकून पडत असल्याची स्थिती आहे. याशिवाय तालुका व उपविभागीय कृषी अधिकाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने अनेक ठिकाणी 'प्रभारी' अधिकाऱ्यांच्या भरवशावर कारभार सुरू आहे.

यामुळे कृषी दिनानिमित्त शेतकऱ्यांच्या विकासाच्या घोषणा करण्यापेक्षा कृषी विभाग सक्षम करण्यासाठी तातडीने भरती प्रक्रिया राबविण्याची मागणी शेतकरी तसेच विविध संघटनांकडून होत आहे.

कृषी विभागाकडे सरकारचे दुर्लक्ष

राज्याची अर्थव्यवस्था मोठ्या प्रमाणावर शेतीवर अवलंबून असताना कृषी विभागाकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याची टीका होत आहे. केंद्र व राज्य शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविणे, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि विविध योजनांचा लाभ वेळेत मिळवून देण्यासाठी कृषी विभागातील सर्व रिक्त पदे तातडीने भरली पाहिजेत. यामुळे विभागावरील कामाचा ताण कमी होईल, योजनांची प्रभावी अंमलबजावणी होईल आणि हजारो बेरोजगार तरुणांनाही रोजगाराची संधी उपलब्ध होईल, असे स्पर्धा परीक्षा विद्यार्थी संघटनेचे राज्य उपाध्यक्ष प्रशांत शिरगूर यांनी म्हटले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages