अक्कलकोट आगारात पाच 'राजमाता जिजाऊ' बस; रंगभवन मार्गावरील प्रवाशांना दिलासा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, July 8, 2026

अक्कलकोट आगारात पाच 'राजमाता जिजाऊ' बस; रंगभवन मार्गावरील प्रवाशांना दिलासा

अक्कलकोट आगारात पाच 'राजमाता जिजाऊ' बस; रंगभवन मार्गावरील प्रवाशांना दिलासा



अक्कलकोट (कटूसत्य वृत्त) : अक्कलकोट आगाराच्या ताफ्यात लवकरच पाच नव्या अत्याधुनिक 'राजमाता जिजाऊ' बस दाखल होणार असून, या बस अक्कलकोट–रंगभवन मार्गावर धावणार आहेत. आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे राज्य परिवहन महामंडळाने या बस मंजूर केल्या आहेत. पुढील चार दिवसांत या बस अक्कलकोट आगारात दाखल होण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.

अक्कलकोट शहर व तालुक्यातील सार्वजनिक वाहतूक अधिक सक्षम करण्यासाठी आमदार कल्याणशेट्टी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या पाठपुराव्यामुळे यापूर्वीही अक्कलकोट आगाराला सुमारे २० बीएस-६ मॉडेलच्या नव्या बस मिळाल्या होत्या. आता 'राजमाता जिजाऊ' बस दाखल होत असल्याने प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व आधुनिक प्रवासाचा लाभ मिळणार आहे.

विशेषतः अक्कलकोट–रंगभवन मार्गावर दररोज प्रवास करणारे नोकरदार, विद्यार्थी, व्यापारी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना या नव्या बसमुळे मोठा दिलासा मिळणार आहे. शटल सेवेसाठी वापरण्यात येणाऱ्या या बसमुळे गर्दी कमी होऊन प्रवास अधिक सुलभ होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

५५ आसनक्षमतेच्या या अत्याधुनिक बसमध्ये प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे, पॅनिक बटण, जीपीएस ट्रॅकिंग प्रणाली, इलेक्ट्रॉनिक मार्ग फलक आणि पब्लिक अनाउन्समेंट प्रणालीची सुविधा उपलब्ध आहे. तसेच मोबाईल चार्जिंग पॉईंट, रीडिंग लॅम्प आणि अतिरिक्त उभे राहण्याची व्यवस्था असल्याने प्रवास अधिक सोयीस्कर होणार आहे.

दरम्यान, अक्कलकोट येथे सुमारे २९ कोटी रुपयांच्या खर्चातून उभारण्यात येत असलेल्या नव्या बसस्थानकाचे कामही वेगाने सुरू असून, ते सप्टेंबरअखेर पूर्ण होण्याची शक्यता आहे. नव्या बसस्थानकासह अत्याधुनिक बस सेवेमुळे अक्कलकोटची सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होणार असल्याचे चित्र आहे.

याबाबत आमदार सचिन कल्याणशेट्टी म्हणाले, "अक्कलकोटकरांना सुरक्षित, दर्जेदार आणि वेळेत एसटी सेवा मिळावी, यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. नव्या 'राजमाता जिजाऊ' बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक आरामदायी व सुलभ होईल. सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेला अधिक बळकटी देण्यासाठी पुढेही प्रयत्न सुरू राहतील."

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages