जुनी मिल प्रकरणातील उर्वरित १२२ नागरिकांनाही मिळणार मूळ दरात प्लॉट
२० जुलै रोजी जुनी मिल मैदानावर संपर्काचे आवाहन; फसवणूकग्रस्तांसाठी ९ ऑगस्टपासून आंदोलनाची घोषणा
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जुनी मिल प्रकरणातील उर्वरित १२२ नागरिकांनाही न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, संबंधितांनी २० जुलै रोजी जुनी मिल मैदान येथे संपर्क साधावा, असे आवाहन जुनी मिल बेकार कामगार वारसदार व जनहित संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष कुमार करजगी यांनी केले. पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली.
करजगी म्हणाले की, जुनी मिल बंद झाल्यानंतर हजारो कामगारांचे आयुष्य उद्ध्वस्त झाले. अनेक कामगारांचे दावे न्यायालयात दाखलच झाले नसल्याचे लक्षात आल्यानंतर १९८८ मध्ये संघर्ष समितीची स्थापना करण्यात आली. त्यानंतर सुमारे नऊ हजार कामगारांचे दावे न्यायालयात दाखल करण्यात आले. तब्बल ३५ वर्षांच्या संघर्षानंतर कामगारांना त्यांच्या हक्काचा मोबदला मिळवून देण्यात यश आल्याचा दावा त्यांनी केला.
जुनी मिलची जागा बिल्डर्सच्या घशात जाण्याऐवजी सर्वसामान्य नागरिकांना परवडणाऱ्या दरात प्लॉट मिळावेत, या उद्देशाने न्यायालयीन लिलावात सहभाग घेतल्याचेही त्यांनी सांगितले. त्यावेळी ७७८ नागरिकांनी न्यायालयात रक्कम जमा केली होती. मात्र, विविध कारणांमुळे लिलाव प्रक्रिया रद्द झाल्याने नागरिकांची रक्कम न्यायालयातच अडकून पडली.
यानंतर दीर्घ न्यायालयीन लढ्यानंतर उमा सहकारी गृहनिर्माण संस्थेमार्फत पात्र नागरिकांना प्लॉटचे वाटप करण्यात आले. मात्र, महापालिकेच्या आरक्षणामुळे १२२ नागरिकांना अद्याप त्यांच्या प्लॉटचा प्रत्यक्ष ताबा मिळालेला नाही. या सर्व नागरिकांना न्यायालयाने निश्चित केलेल्या मूळ दरात प्लॉट उपलब्ध करून देण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाणार असल्याचे करजगी यांनी स्पष्ट केले.
प्लॉट मिळाल्यानंतरही स्वतःविरोधात तक्रारी करणाऱ्यांविषयी कोणताही आकस न ठेवता त्यांनाही मूळ दरात प्लॉट देण्यात येणार असल्याचे सांगत, संबंधित सर्वांनी २० जुलै रोजी जुनी मिल मैदान येथे उपस्थित राहून आवश्यक कागदपत्रांसह संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी काही बिल्डर्सनी जुनी मिलच्या नावाखाली पैसे घेऊन अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा गंभीर आरोपही करजगी यांनी केला. अशा फसवणूकग्रस्तांना न्याय मिळवून देण्यासाठी येत्या ९ ऑगस्ट क्रांती दिनापासून आंदोलन सुरू करण्यात येणार असल्याची घोषणाही त्यांनी केली. न्यायालयातून ज्या दरात जागा मिळाली, त्याच दरात संबंधितांना प्लॉट देण्याचे दिलेले वचन पूर्ण करण्यासाठी संघर्ष समिती कटिबद्ध असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
No comments:
Post a Comment