बाप उपअभियंता... मुलगा कंत्राटदार! मुलाणी याचा कारनामा उघड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

बाप उपअभियंता... मुलगा कंत्राटदार! मुलाणी याचा कारनामा उघड

 बाप उपअभियंता... मुलगा कंत्राटदार! मुलाणी याचा कारनामा उघड

कामाचा अंदाज स्वतःच तयार, मुलालाच कामाचा आदेश; संपूर्ण व्यवहारावर संशय, उच्चस्तरीय चौकशीची मागणी



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- माळशिरस पंचायत समितीच्या बांधकाम विभागात सरकारी नियमांना हरताळ फासण्यात आला आहे का? असा प्रश्न उपस्थित करणारे कागदपत्रे समोर आली आहेत. धर्मपुरी येथील पालखी स्वागत परिसराच्या कामाचा आदेश उपअभियंता मुलाणी यांच्या मुलगा एजाज मुलाणी यांच्या नावाने देण्यात आल्याचे दिसून येत आहे. धक्कादायक बाब म्हणजे या कामाचा खर्चाचा अंदाजही स्वतः उपअभियंता मुलाणी यांनीच तयार केल्याची नोंद अधिकृत कागदपत्रात आहे.
यामुळे "आराखडा बापाने तयार करायचा आणि काम मुलाने घ्यायचे" अशीच पद्धत पंचायत समितीत सुरू आहे का, असा संतप्त सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सरकारी अधिकाऱ्याने स्वतःच्या नातेवाईकाला लाभ होईल अशा प्रक्रियेत सहभागी होऊ नये, हा प्रशासनातील मूलभूत नियम आहे. मात्र या प्रकरणात तो पाळला गेला का? काम देताना इतर कंत्राटदारांना समान संधी देण्यात आली का? की संपूर्ण प्रक्रिया आधीच ठरवून राबविण्यात आली? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे आता प्रशासनाला द्यावी लागणार आहेत.
या प्रकरणातील सर्व कागदपत्रे, कामाची मोजमाप पुस्तिका, बिले, देयके, मंजुरी आणि निविदा प्रक्रियेची स्वतंत्र चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे. तसेच संबंधित उपअभियंत्यांच्या कार्यकाळातील इतर सर्व कामांचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे.
सरकारी निधी हा जनतेच्या कराच्या पैशातून उभा राहतो. त्यामुळे अशा प्रकारच्या संशयास्पद व्यवहारांवर पडदा टाकण्याऐवजी दोषी कोण आहे हे शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. आता जिल्हा परिषद प्रशासन, मुख्य कार्यकारी अधिकारी आणि पालकमंत्री या प्रकरणाची दखल घेणार का, की हे प्रकरणही फाईलमध्येच दडपले जाणार, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages