खरात' मोकळा आणि सरपंचाला बेड्या; पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर संताप, कारवाईच्या निकषांवर प्रश्न - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

खरात' मोकळा आणि सरपंचाला बेड्या; पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर संताप, कारवाईच्या निकषांवर प्रश्न

 खरात' मोकळा आणि सरपंचाला बेड्या; पोलिसांच्या दुहेरी भूमिकेवर संताप, कारवाईच्या निकषांवर प्रश्न




सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- सध्या पोलिसांच्या कारवाईवर महाराष्ट्रातील जनता तीव्र नाराजी व्यक्त करीत असून, गंभीर गुन्ह्यांतील आरोपी आणि आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांशी पोलिसांनी केलेल्या वागणुकीत मोठी तफावत असल्याचाही आरोप करण्यात येत आहे. यामुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर आणि आरोपींना बेड्या ठोकण्याच्या निकषांवर पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.

 'खरात (भोंदू) बाबा' वर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असतानाही त्याला न्यायालयात नेताना हातकड्या लावण्यात आल्या नाहीत. त्याउलट, गावातील शाळेत शिक्षकांची नियुक्ती करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करणाऱ्या मंगेश साबळे सारख्या सरपंच व सामाजिक कार्यकर्त्याला मात्र एखाद्या सराईत गुन्हेगाराप्रमाणे बेड्या ठोकून न्यायालयात नेण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

सरपंचाने मुलांच्या शिक्षणासाठी आणि शिक्षकांच्या रिक्त पदांच्या भरतीसाठी आंदोलन केले होते, अशा व्यक्तीचा सार्वजनिकरीत्या अवमान झाल्याची भावना व्यक्त करण्यात आली आहे. ही कारवाई लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी असून, राज्यात हुकूमशाहीकडे वाटचाल सुरू असल्याची टीकाही या सोशल मीडियावर करण्यात आली आहे.

दरम्यान, या प्रकरणामुळे पोलिसांकडून आरोपींना किंवा अटकेत असलेल्या व्यक्तींना हातकड्या लावण्याबाबत कोणते नियम आणि निकष लागू केले जातात, यावरही प्रश्न उपस्थित होत आहेत. कायद्यानुसार, प्रत्येक अटक केलेल्या व्यक्तीला नियमितपणे हातकड्या लावण्याची परवानगी नसून, पळून जाण्याचा धोका, हिंसक वर्तन किंवा इतर विशेष परिस्थिती असल्यासच त्याचा वापर करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने विविध निर्णयांत मार्गदर्शक तत्त्वे दिली आहेत.

सोशल मीडियावरील या पोस्टनंतर संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून पोलिसांनी कारवाईबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी काही नागरिकांकडून व्यक्त होत आहे. मात्र, या प्रकरणावर संबंधित पोलीस विभागाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages