एआयच्या युगात निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारिता - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

एआयच्या युगात निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारिता

 एआयच्या युगात निर्भीड, वस्तुनिष्ठ पत्रकारिता 

जपणे हीच खरी कसोटी- श्रीकांत मोरे




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- अलिकडच्या टाळात निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचे धाडस कमी होत असून अनेक महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहत आहेत  सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावामुळे निर्भीड, वस्तूनिष्ठ पत्रकारिता जपणे ही खरी कसोटी आहे,असे सांगत कै. अविनाश कुलकर्णी हे अभ्यासू, मितभाषी आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार होते ,असे प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केले.    
          सोमवारी, श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कै. अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक रविंद्र देशमुख यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सुराज्यचे संपादक राकेश टोळये , कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी,आदी उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
          मोरे म्हणाले, पत्रकारितेचे मूलभूत ध्येय म्हणजे समाजात जनजागृती करणे आणि सत्तेला प्रश्न विचारणे आहे. पत्रकारांनी पडताळणी, अभ्यास आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत लोकहिताची भूमिका कायम ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.
       सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले, अविनाश कुलकर्णी यांची तत्त्वनिष्ठ, निस्वार्थी पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांचे पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले. त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला, हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्काराने जबाबदारी वाढली असल्याचे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला.
       प्रारंभी  कै. अविनाश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केले. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केले. सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, अभय दिवाणजी, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्रा. बाळासाहेब भास्कर, अविनाश सिताराम कुलकर्णी, प्रशांत जोशी,  भगवान परळीकर, दशरथ वडतिले , प्रशांत बडवे, पद्माकर कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

चौकट

पत्रकारिता ही समाजाचा 
आरसा :  राकेश टोळये 

संपादक राकेश टोळये म्हणाले, कै. अविनाश कुलकर्णी यांनी आयुष्यभर वस्तुनिष्ठ, संयमी आणि मूल्याधिष्ठित पत्रकारिता केली. सत्य मांडताना त्यांनी कधीही भाषेचा तोल ढळू दिला नाही. पत्रकारिता ही समाजाचा आरसा असून बातमी जशी घडली तशीच मांडली पाहिजे. लोकमान्य टिळकांच्या साध्या व सर्वसामान्यांना समजणाऱ्या भाषेच्या पत्रकारितेचा उल्लेख त्यांनी यावेळी केला. रवींद्र देशमुख यांना अविनाश कुलकर्णी यांच्या नावाचा पुरस्कार मिळणे हा मोठा सन्मान असून त्यामुळे त्यांच्या पत्रकारितेची जबाबदारी अधिक वाढली आहे. पत्रकारांनी समाजाप्रती दातृत्व आणि सामाजिक बांधिलकीही जपावी, असे आवाहन त्यांनी केले.


आस्था रोटी बँकेला दिली 
पुरस्काराची रक्कम 

यावेळी सत्कारमूर्ती रवींद्र देशमुख यांनी पुरस्काराच्या स्वरूपात मिळालेली रक्कम आस्था रोटी बँकेला प्रदान करत सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी आस्था रोटी बँकेचे अध्यक्ष आनंद तालीकोटी व पदाधिकारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages