सापटणे येथील पत्राशेडमधून ६० हजारांच्या शेळ्या-बोकडांची चोरी; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा
टेंभुर्णी (कटूसत्य वृत्त):- माढा तालुक्यातील सापटणे (टें.) येथे अज्ञात चोरट्यांनी घरासमोरील पत्राशेडमध्ये बांधून ठेवलेल्या शेळ्या व बोकडांची चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. या चोरीमध्ये सुमारे ६० हजार रुपये किमतीची दोन शेळ्या, दोन पाटी (मादी शेळ्या) आणि दोन बोकड लंपास करण्यात आले असून, या प्रकरणी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन महादेव जगताप (वय ३८, रा. सापटणे, ता. माढा) यांनी आपल्या घरासमोरील पत्राशेडमध्ये दोन मोठ्या काळ्या रंगाच्या शेळ्या, दोन काळ्या रंगाच्या पाटी आणि दोन काळ्या रंगाचे बोकड बांधून ठेवले होते. शुक्रवारी (४ जुलै) रात्री सुमारे १२.१५ वाजल्यापासून शनिवारी (५ जुलै) पहाटे ५.३० वाजेपर्यंतच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी संधी साधून ही जनावरे चोरून नेली.
शनिवारी पहाटे जनावरांना चारा-पाणी देण्यासाठी शेडमध्ये गेले असता सर्व जनावरे गायब असल्याचे दिसून आले. त्यानंतर जगताप यांनी परिसरात व नातेवाईकांकडे शोधाशोध केली. मात्र, जनावरे कुठेही आढळून न आल्याने चोरी झाल्याची खात्री झाली.
यानंतर त्यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळाची पाहणी करून तपास सुरू केला आहे.
गेल्या काही दिवसांत ग्रामीण भागात जनावरांच्या चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पशुपालकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या वेळी पत्राशेड व गोठ्यांच्या सुरक्षेसाठी अधिक दक्षता घेण्याची गरज निर्माण झाली असून, पोलिसांनीही नागरिकांनी संशयास्पद हालचाली दिसल्यास त्वरित माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

No comments:
Post a Comment