मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा- पृथ्वीराज पाटील - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 14, 2026

मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा- पृथ्वीराज पाटील

मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा- पृथ्वीराज पाटील




करमाळा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाकडून सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण (SIR) अभियानात आमदार नारायण पाटील गटातील सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवून गावागावातील पात्र नागरिकांची मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी, तसेच मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी सतर्क राहावे, असे आवाहन पाटील गटाचे युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले आहे.
याबाबत माहिती देताना पृथ्वीराज पाटील म्हणाले की, एसआयआर प्रक्रिया ही आगामी ग्रामपंचायत, स्थानिक स्वराज्य संस्था तसेच विधानसभा आणि इतर निवडणुकांसाठी अत्यंत महत्त्वाची असून, अचूक व पारदर्शक मतदार यादी तयार करण्याचा हा महत्त्वाचा टप्पा आहे. त्यामुळे प्रत्येक गावातील व वाडी-वस्तीवरील १८ वर्षे पूर्ण केलेल्या नवमतदारांनी आपले नाव मतदार यादीत समाविष्ट झाले आहे का, याची खात्री करून घ्यावी.
तसेच मतदार यादीत दुबार किंवा बोगस नावे आढळल्यास, तसेच मृत व्यक्ती किंवा कायमस्वरूपी स्थलांतरित झालेल्या नागरिकांची नावे अद्याप यादीत असल्यास, संबंधित बीएलओ यांच्याकडे तातडीने हरकत नोंदवावी, असेही त्यांनी सांगितले.
विधानसभा निवडणुकीपूर्वी पाटील गटातील अनेक कार्यकर्त्यांनी बीएलए (Booth Level Agent) म्हणून जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली होती. त्यामुळे मतदार यादी अधिक अचूक आणि पारदर्शक बनण्यास मदत झाली. आता आगामी ग्रामपंचायत निवडणुका आणि भविष्यातील सर्व निवडणुका लक्षात घेऊन कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा जबाबदारीने या मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले.
एसआयआर मोहिमेची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे मतदार यादीतील बोगस व दुबार नावे वगळणे, मृत व स्थलांतरित नागरिकांची नावे कमी करणे, नवमतदारांची नोंदणी करणे आणि मतदान प्रक्रियेत पारदर्शकता वाढविणे ही आहेत.
पाटील गटातील सर्व आजी-माजी पदाधिकारी, आमदार नारायण आबा पाटील मित्रमंडळाचे पदाधिकारी तसेच बीएलए म्हणून जबाबदारी सोपविण्यात आलेल्या कार्यकर्त्यांनी या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा. मतदार यादी, बीएलओ किंवा एसआयआर प्रक्रियेबाबत अधिक माहिती अथवा तक्रारी असल्यास आमदार कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहनही युवा नेते पृथ्वीराज पाटील यांनी केले.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages