नशामुक्त भारत अभियानाची जबाबदारी शालेय समित्यांवर; तंबाखूमुक्त परिसरासाठी विशेष मोहीम
सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- केंद्र सरकारच्या ‘नशामुक्त भारत’ अभियानाला गती देण्यासाठी राज्यातील शाळा व महाविद्यालयांच्या शालेय व्यवस्थापन समित्यांवर महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तंबाखूमुक्त परिसर निर्माण करणे, विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांविषयी जनजागृती करणे तसेच समुपदेशन आणि मार्गदर्शनाची व्यवस्था उभारणे ही कामे आता समित्यांना करावी लागणार आहेत.
केंद्र शासनाने २०२९ पर्यंत देशातून अंमली पदार्थांचे समूळ उच्चाटन करण्याचे उद्दिष्ट ठेवले असून त्यासाठी विविध स्तरांवर विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. अवैध अंमली पदार्थांची शेती, उत्पादन, वाहतूक, विक्री आणि सेवन यावर आळा घालण्यासाठी जनजागृतीसह प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर दिला जाणार आहे.
शालेय शिक्षण विभागाने प्रत्येक शाळेत नशामुक्ती मार्गदर्शन व समुपदेशन समिती स्थापन करण्याच्या सूचना दिल्या आहेत. शालेय परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी विशेष कार्यक्रम राबविणे, त्यावर देखरेख ठेवणे, व्यसनमुक्ती क्षेत्रात कार्यरत संस्था, तज्ज्ञ आणि अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे तसेच विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करणे ही जबाबदारी समित्यांवर राहणार आहे.
याशिवाय विद्यार्थ्यांच्या वर्तनातील बदल ओळखून पालकांशी संवाद साधणे, आवश्यकतेनुसार समुपदेशन करणे आणि व्यसनांच्या दुष्परिणामांविषयी माहिती देणे यावरही भर देण्यात आला आहे. यापूर्वी शाळांमध्ये व्यसनमुक्तीबाबत विविध सत्रे आयोजित केली जात होती. आता शासनाच्या नव्या आदेशानुसार ही मोहीम अधिक व्यापक स्वरूपात राबवावी लागणार आहे.
शिक्षक सहकार संघटनेचे अध्यक्ष नीलेश देशमुख यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांपासून दूर ठेवण्यासाठी यापूर्वीही विविध उपक्रम राबविले जात होते. नव्या निर्देशांमुळे या कामाला अधिक संघटित स्वरूप मिळणार असून शाळांची भूमिका अधिक महत्त्वाची ठरणार आहे.
दरम्यान, शालेय व्यवस्थापन समित्यांसोबतच सखी सावित्री समिती, महिला तक्रार निवारण समिती, अंतर्गत तक्रार निवारण समिती तसेच विद्यार्थी सुरक्षा व भौतिक सुविधा विकास समित्याही कार्यरत असून आता नशामुक्ती अभियानामुळे शाळांच्या जबाबदाऱ्यांमध्ये आणखी वाढ झाली आहे.
No comments:
Post a Comment