गृहनिर्माण संस्थांना डिम्ड कन्व्हेन्स सेवा सहा महिन्यांत देणार
पुणे (कटूसत्य वृत्त):- गृहनिर्माण संस्थांना आता मानीव अभिहस्तांतरण अर्थात डिम्ड कन्व्हेन्स ऑनलाईन अर्ज केल्यानंतर सहा महिन्यांतच देण्याचा निर्णय सहकार विभागाने घेतला आहे. ही सुविधा पुढील महिन्यापासून सुरू करण्यात येणार आहे. त्यामुळे गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांचे हेलपाटे कमी होणार असून संस्थांच्या नावावर जमीन होण्याचा कालावधी कमी होणार आहे.
राज्य सरकारने गृहनिर्माण संस्थांना जमिनी नावावर करून देण्यासाठी मानीव अभिहस्तांतरण मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अर्जाची किचकट प्रक्रिया, सतत
मारावे लागणारे हेलपाटे यामुळे ही मोहीम हाती घेऊनही संस्थांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचे स्पष्ट झाले आहे. ही प्रक्रिया अधिक गतिमान करणे आणि सोसायट्यांकडून अधिक प्रतिसाद कसा मिळेल, यासाठी सरकारने सध्याच्या प्रक्रियेतील अडचणी दूर करून ही सेवा अधिक सुटसुटीत करण्यासाठी मानीव अभिहस्तांतरणाचा समावेश अधिसूचित सेवेमध्ये केला आहे. सहकार विभागाने आता त्यापुढे एक पाऊल टाकत आता सोसायट्यांना ही सेवा ऑनलाइन उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी महाआयटीच्या मदतीने ही सेवा देण्यात येणार आहे. आवश्यक ती सर्व कायदेशीर
कागदपत्रे अर्जासोबत जोडून अर्ज केल्यानंतर नोटीस निघाल्यानंतर सहा महिन्यांच्या आत सोसायटीला मानीव अभिहस्तांतरण करून देण्याचे उद्दिष्ट विभागाने ठेवले आहे. मोफा कायद्यातंर्गत प्रक्रिया पार पडणार आहे.
No comments:
Post a Comment