अधिकारी ऐकत नसल्याने उपमहापौरांचा सह्यांना नकार; खुर्च्यांसाठी महिनाभर प्रतीक्षा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

अधिकारी ऐकत नसल्याने उपमहापौरांचा सह्यांना नकार; खुर्च्यांसाठी महिनाभर प्रतीक्षा

 अधिकारी ऐकत नसल्याने उपमहापौरांचा सह्यांना नकार; खुर्च्यांसाठी महिनाभर प्रतीक्षा

भाजपमधील अंतर्गत मतभेदांची चर्चा पुन्हा रंगली



सोलापूर (कटूसत्य वृत्त) :- महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आपल्या सूचनांची दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी पालिकेच्या कोणत्याही कागदपत्रांवर सह्या करण्यास नकार दिल्याची भूमिका जाहीर केली आहे. कार्यालयात नागरिकांसाठी बसण्याच्या खुर्च्या उपलब्ध करून देण्याची मागणी महिनाभरापूर्वी करूनही प्रशासनाने अद्याप कार्यवाही न केल्याचा आरोप त्यांनी केला.

लोकमतशी बोलताना देवकर म्हणाल्या की, प्रत्येक मंगळवारी सकाळी ११ ते सायंकाळी ६ या वेळेत त्या जनता दरबार घेत असून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. मात्र कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना बसण्यासाठी पुरेशा खुर्च्या नसल्याने अडचणी निर्माण होत आहेत. स्थायी समिती सभापती व सभागृह नेत्यांच्या कार्यालयात अतिरिक्त खुर्च्या उपलब्ध असून त्यातील काही खुर्च्या उपमहापौर कार्यालयात देण्याची सूचना करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला.

देवकर यांनी कार्यालयातील एसी काढून पर्यावरणपूरक दुरुस्ती करण्याची सूचनाही दिली असल्याचे सांगितले. तसेच कार्यालयात येणाऱ्या नागरिकांसाठी चहा, पाणी आणि अल्पोपहाराची व्यवस्था स्वतःच्या खर्चातून करावी लागत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यालयाशेजारील २० बाय २० फूट हॉल उपमहापौर कार्यालयासाठी उपलब्ध करून दिल्यास नागरिकांशी संवाद साधणे अधिक सुलभ होईल, अशी मागणीही त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.

दरम्यान, उपमहापौर कार्यालयाच्या सुशोभीकरणाच्या प्रस्तावाला यापूर्वी भाजप शहराध्यक्षा तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर यांनी विरोध दर्शविल्यानंतर दोघींमधील मतभेद चर्चेत आले होते. पक्षातील नेत्यांनी हे मतभेद मिटल्याचा दावा केला असला तरी कार्यालयीन सुविधांच्या मुद्द्यावर देवकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतल्याने भाजपमधील अंतर्गत वादाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages