मोहोळ तालुका सोलापूरशीच कायम ठेवण्याची मागणी; महसूलमंत्र्यांनी दिले सकारात्मक संकेत - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

मोहोळ तालुका सोलापूरशीच कायम ठेवण्याची मागणी; महसूलमंत्र्यांनी दिले सकारात्मक संकेत

 मोहोळ तालुका सोलापूरशीच कायम ठेवण्याची मागणी; महसूलमंत्र्यांनी दिले सकारात्मक संकेत

आ. राजू खरे यांची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट; लोकभावनेचा आदर करून आवश्यक कार्यवाहीचे निर्देश




मुंबई/मोहोळ (कटूसत्य वृत्त) : पंढरपूर येथे मंजूर करण्यात आलेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात मोहोळ तालुक्याचा समावेश करण्याच्या प्रक्रियेला विरोध करत आमदार राजू खरे यांनी राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन मोहोळ तालुक्यातील जनतेची भूमिका ठामपणे मांडली. मोहोळ तालुका पूर्ववत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न ठेवावा, अशी मागणी करत त्यांनी सविस्तर निवेदन महसूलमंत्र्यांना सादर केले.


आमदार खरे यांनी महसूलमंत्र्यांना सांगितले की, मोहोळ तालुक्यातील महसुली, प्रशासकीय, न्यायालयीन, शैक्षणिक, आरोग्यविषयक तसेच बहुतांश शासकीय व्यवहार हे सोलापूर शहराशी निगडित आहेत. भौगोलिकदृष्ट्याही सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय नागरिकांसाठी अधिक सोयीचे असल्याने मोहोळ तालुक्याचा पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करणे व्यवहार्य ठरणार नाही. त्यामुळे संपूर्ण तालुक्याची भावना लक्षात घेऊन मोहोळ तालुका पूर्ववत सोलापूरशीच संलग्न ठेवण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


या मागणीची महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी गंभीर दखल घेतल्याचे आमदार खरे यांनी सांगितले. बैठकीनंतर महसूलमंत्र्यांनी सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत लेखी आदेश जारी केल्याची माहिती देण्यात आली. तसेच त्यांनी दूरध्वनीद्वारे जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून मोहोळ तालुक्यातील लोकभावनेचा आदर राखत मांडलेल्या मुद्द्यांवर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्याचेही आमदार खरे यांनी सांगितले.


मोहोळ तालुका पूर्ववत सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयाशीच संलग्न राहावा, यासाठी आवश्यक ती प्रशासकीय प्रक्रिया करण्याचे निर्देशही महसूलमंत्र्यांनी दिल्याचा दावा आमदार खरे यांनी केला आहे.


या निर्णयाबाबत महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकहिताला प्राधान्य देत सकारात्मक भूमिका घेतल्याबद्दल आमदार राजू खरे यांनी त्यांचे आभार मानले. मोहोळ तालुक्यातील नागरिकांच्या प्रशासकीय सोयी, लोकभावना आणि न्याय्य हक्कांसाठी आपला पाठपुरावा भविष्यातही कायम राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.


मोहोळ तालुक्याचा पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समावेश करण्याच्या प्रस्तावावर गेल्या काही दिवसांपासून विविध स्तरांतून विरोध व्यक्त केला जात असून, या पार्श्वभूमीवर महसूलमंत्र्यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे तालुक्यातील नागरिकांमध्ये दिलास्याचे वातावरण निर्माण झाले आहे. अंतिम प्रशासकीय निर्णयाकडे आता मोहोळकरांचे लक्ष लागले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages