मोहोळ तालुका पंढरपूरला जोडण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, July 4, 2026

मोहोळ तालुका पंढरपूरला जोडण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार

मोहोळ तालुका पंढरपूरला जोडण्याच्या निर्णयाविरोधात एल्गार

माजी आ. राजन पाटील हरकती यांचे दाखल करण्याचे आवाहन




पंढरपूर (कटूसत्य वृत्त) : पंढरपूर येथे नव्याने मंजूर झालेल्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयास मोहोळ तालुका जोडण्याच्या प्रस्तावाला विरोध वाढत आहे. भौगोलिकदृष्ट्या मोहोळ तालुक्यासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्यालय अधिक सोयीचे असल्याने मोहोळ तालुका पूर्वीप्रमाणेच सोलापूर प्रशासकीय कार्यक्षेत्रात ठेवावा, अशी मागणी जोर धरत आहे. यासाठी महसूल विभागाकडे हरकती दाखल करण्यास सुरुवात झाली असून सर्वपक्षीय आंदोलनाचीही तयारी सुरू आहे.

महसूल विभागाने राज्यात ८८ नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालयांना मंजुरी दिली असून त्यामध्ये पंढरपूर कार्यालयाचाही समावेश आहे. या कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात करमाळा, सांगोला, माळशिरस, पंढरपूर, माढा, मंगळवेढा आणि मोहोळ या सात तालुक्यांचा समावेश करण्यात आला आहे.

मात्र, मोहोळ तालुक्यातील अनेक गावांसाठी सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालय अधिक जवळ आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाजासाठी सोयीचे असल्याने मोहोळ तालुका पंढरपूरऐवजी सोलापूर कार्यालयालाच जोडावा, अशी मागणी स्थानिक पातळीवर होत आहे. या संदर्भात माजी आमदार राजन पाटील आणि यशवंत माने यांनीही आपली भूमिका मांडली असून, मोहोळ तालुक्यातील अनेक ग्रामपंचायती तसेच अनगर नगरपंचायतीनेही याबाबत ठराव केल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, मोहोळ तालुका पंढरपूर अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाशी जोडण्याच्या प्रस्तावावर हरकती नोंदविण्यासाठी सरकरने ९ जुलैपर्यंत मुदत दिली आहे. संबंधित तालुक्यांमध्ये या विषयावर जनमत तयार करण्यासाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत.

मोहोळचे माजी आमदार तथा भाजपने नेते माजी आमदार राजन पाटील यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे. ग्रामपंचायती, सहकारी संस्था आणि विविध संघटनांचे विरोधी ठराव गोळा करून सरकारकडे हरकती दाखल करण्याचे आवाहन माजी आमदार पाटील यांनी केले आहे.

मोहोळ तालुका पंढरपूर अपर जिल्हाधिकारी कार्यालयाला जोडण्याच्या निर्णयाला आमचा तीव्र विरोध आहे. या प्रश्नी आम्ही शिष्टमंडळ घेऊन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांना भेटून भौगोलिक व वस्तुस्थिती सांगणार आहोत. आमची मागणी मान्य झाली नाही तर या प्रश्नी तीव्र संघर्ष करण्यात येईल, असा इशारा माजी आमदार पाटील यांनी दिला आहे. 

महसूल विभागाने या प्रस्तावासंदर्भात हरकती व सूचना मागवल्या असून मोहोळ तालुका सोलापूर प्रशासकीय कार्यक्षेत्रातच कायम ठेवण्यासाठी नागरिक, लोकप्रतिनिधी आणि विविध संघटनांकडून हरकती नोंदविल्या जात आहेत.

या पार्श्वभूमीवर मोहोळ येथे शनिवारी (४ जुलै) सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकीत 'मोहोळ तालुका संघर्ष समिती'ची स्थापना करून पुढील आंदोलनाची दिशा निश्चित केली जाणार असल्याची माहिती मिळाली आहे.

दरम्यान, मोहोळ तालुक्यात अपर कार्यालयाचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. यापूर्वी अनगर येथील अपर तहसील कार्यालयाच्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झाला होता आणि तो विधानसभा निवडणुकीतही गाजला होता. आता पंढरपूरच्या अपर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कार्यक्षेत्रावरून पुन्हा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे दिसत असून या मुद्द्यावर मोहोळ तालुक्यातील सर्वपक्षीय नेते एकत्र येताना दिसत आहेत.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages