कृषीमाल वाहतुकीसाठी सोलापूर विभागाकडून 'किसान रेल्वे'चा निर्णय - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Tuesday, July 21, 2026

कृषीमाल वाहतुकीसाठी सोलापूर विभागाकडून 'किसान रेल्वे'चा निर्णय

 कृषीमाल वाहतुकीसाठी सोलापूर विभागाकडून 'किसान रेल्वे'चा निर्णय

कार्गो स्पेशल गाड्यांनाही हिरवा कंदील; इथेनॉल वाहतूक व आषाढी वारीसाठी विशेष सुविधांवर भर



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भाजीपाला, फळे व अन्य कृषी उत्पादनांची देशभरातील बाजारपेठांमध्ये जलद, सुरक्षित आणि कमी खर्चात वाहतूक करता यावी, यासाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने 'किसान रेल्वे' आणि विशेष कार्गो स्पेशल गाड्या सुरू करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. नुकत्याच झालेल्या विशेष बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून, रेल्वेच्या विविध विकासकामांसह वारकऱ्यांच्या सुविधांवरही सविस्तर चर्चा करण्यात आली.

या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील भाजीपाला, फळे व अन्य कृषी उत्पादने देशातील विविध बाजारपेठांपर्यंत रेल्वेमार्गाने जलदगतीने पाठवता येणार आहेत. वाहतूक खर्च कमी होऊन शेतमालाला अधिक चांगला भाव मिळण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

याशिवाय जिल्ह्यातील साखर कारखान्यांमध्ये तयार होणारे इथेनॉल आणि गूळ यांची वाहतूकही रेल्वेमार्गाने करण्यासाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येत आहे. यामुळे औद्योगिक मालवाहतुकीलाही मोठी चालना मिळणार आहे.

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात येणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी रेल्वे प्रशासनाकडून विशेष सुविधा उपलब्ध करून देण्याचेही ठरविण्यात आले. पादचारी पूल, स्वच्छतागृहे तसेच इतर मूलभूत सुविधांची उभारणी करण्याचे निर्देश संबंधित विभागांना देण्यात आले आहेत.

बैठकीला सोलापूर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुजित मिश्रा, वरिष्ठ अधिकारी दिग्विजय, अतुल लोकरे यांच्यासह नगरसेवक प्रियदर्शन साठे, भीमा वाघमारे आणि मिलिंद ठोंबरे आदी उपस्थित होते.

रेल्वे पूल व अंडरपासच्या कामांना गती

मरीआई चौक ते भैय्या चौक दरम्यान सुरू असलेला रेल्वे पूल लवकरात लवकर पूर्ण करण्याचे निर्देश राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आले. तसेच रामवाडी आणि सोनीनगर-हुडको परिसरातील अंडरपासमध्ये पावसाळ्यात होणारी पाणी साचण्याची समस्या कायमस्वरूपी सोडवण्यासाठी मोठ्या ड्रेनेज व्यवस्थेची उभारणी करण्याचाही निर्णय बैठकीत घेण्यात आला.

महत्त्वाचे निर्णय :

  • शेतकऱ्यांसाठी 'किसान रेल्वे' व कार्गो स्पेशल गाड्या सुरू होणार.

  • भाजीपाला, फळे व कृषी उत्पादने रेल्वेमार्गाने जलद आणि कमी खर्चात देशभर पाठविण्याची सुविधा.

  • इथेनॉल आणि गूळ वाहतुकीसाठी स्वतंत्र रेल्वे आराखडा.

  • शेतमालाला चांगला बाजारभाव मिळण्यास मदत.

  • आषाढी वारीसाठी पादचारी पूल, स्वच्छतागृहे आणि अन्य सुविधांची उभारणी.

  • मरीआई चौक–भैय्या चौक रेल्वे पूल आणि अंडरपासमधील पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी उपाययोजना.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages