सोलापुरात सायबर फसवणुकीचे रॅकेट उघड; सात बँक खात्यांचा गैरवापर, गुन्हा दाखल
सोलापूर (कटूसत्य वृत्त): सोलापूर शहर सायबर पोलीस ठाण्याने मोठ्या सायबर फसवणूक प्रकरणाचा पर्दाफाश केला असून, सात बँक खात्यांच्या माध्यमातून नागरिकांची आर्थिक फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
सायबर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार नदाफ यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, गेल्या वर्षभरापासून काही आरोपी संगनमताने महावीर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक येथील सात बँक खात्यांचा वापर करून सायबर गुन्हे करत होते. विविध आमिषे व ऑनलाइन फसवणुकीच्या माध्यमातून नागरिकांकडून उकळलेली रक्कम या खात्यांमध्ये जमा करण्यात येत होती.
तपासादरम्यान संबंधित खात्यांमध्ये संशयास्पद व्यवहार झाल्याचे निदर्शनास आले. फसवणुकीतून मिळालेली रक्कम जाणीवपूर्वक स्वीकारून आरोपींनी बेकायदेशीर मालमत्ता जमा केल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.
या प्रकरणी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) कलम ३१८ (४), ३१८ (२) आणि ३ (५) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या रॅकेटमध्ये आणखी काही अज्ञात व्यक्तींचा सहभाग असल्याचा संशय असून त्यांचा शोध सुरू आहे. प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोपळे करीत आहेत.
चौकट : फसवणुकीसाठी वापरलेली बँक खाती
- खाते क्र. ८००४२०१०००१३४१ – ₹४०,०८६
- खाते क्र. ८००४२०१०००१३४२ – ₹४०,०८६
- खाते क्र. ८००४२०१०००१३४७ – ₹४०,०८६
- खाते क्र. ८००४२०१०००१३५५ – ₹४,९९९
- खाते क्र. ८००४२०१०००१३५७ – ₹१,०००
- खाते क्र. ८००४२०१०००१३५९ – ₹१०,०००
- खाते क्र. ५००४२०१०००११६० – ₹४२,५६०
सायबर पोलिसांचे आवाहन: कोणत्याही अनोळखी व्यक्तीच्या सांगण्यावरून आपल्या बँक खात्याचा वापर करू नये, ओटीपी, बँक तपशील किंवा खाते इतरांना देऊ नयेत. संशयास्पद ऑनलाइन व्यवहार आढळल्यास तात्काळ सायबर हेल्पलाइन १९३० किंवा जवळच्या सायबर पोलीस ठाण्यात संपर्क साधावा.

No comments:
Post a Comment