भेसळयुक्त अन्नपदार्थांचा आता एका दिवसात सोक्षमोक्ष!
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांना शुद्ध व निर्भेळ अन्नपदार्थ मिळावेत, यासाठी अन्न प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी वारीदरम्यान आढळणाऱ्या संशयित अन्नपदार्थांची तातडीने तपासणी करण्यासाठी अन्न प्रशासनाने 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' व्हॅन पालखी सोहळ्यासोबत तैनात केली आहे.
त्यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांचा अवघ्या एका दिवसात सोक्षमोक्ष लागणार असून, या अहवालाच्या आधारे भेसळखोरांवर तत्काळ कारवाई करणेही शक्य होणार आहे.
सध्या प्रसारमाध्यमे आणि समाजमाध्यमांमध्ये अन्न व औषध प्रशासनाची मोठ्या प्रमाणावर चर्चा सुरू आहे. आषाढी एकादशीनिमित्त लाखो वारकरी पंढरपूरमध्ये येतात. या काळात वारकऱ्यांना दर्जेदार व सुरक्षित अन्न मिळावे, यासाठी अन्न प्रशासनाची यंत्रणा सज्ज झाली आहे. आषाढी एकादशीनिमित्त अन्न प्रशासनाने एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी तैनात केले आहेत. त्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील नऊ, तर सांगली, कोल्हापूर आणि पुणे जिल्ह्यांतील ११ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' व्हॅनमुळे प्रयोगशाळेप्रमाणे अधिकृत तपासणी अहवाल अल्पावधीत उपलब्ध होणार आहे.
आयुक्त मुंढे वारीत सहभागी होणार?
अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांचे सोलापूर जिल्हा आणि पंढरपूरशी वेगळे भावनिक नाते आहे. सोलापूरचे जिल्हाधिकारी म्हणून कार्यरत असताना त्यांनी पंढरपूरमधील ६५ एकर परिसराचा विकास केला. तसेच, वारकऱ्यांना चंद्रभागेत स्नान आणि विठ्ठलाचे दर्शन सुलभ व्हावे, यासाठी त्यांनी अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेतले होते. आता अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे आषाढी वारीत सहभागी होणार का, याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
तक्रार असल्यास टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधा
''पालखी सोहळ्यासोबत असलेली 'फूड सेफ्टी ऑन व्हील्स' व्हॅन सोलापूर जिल्ह्यात दाखल होणार आहे. त्यामुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांचे निदान तत्काळ होण्यास मोठी मदत होणार आहे. आषाढी वारीनिमित्त एकूण २० अन्न सुरक्षा अधिकारी कार्यरत आहेत. भेसळयुक्त अन्नपदार्थांबाबत कोणाला तक्रार असल्यास त्यांनी आमच्याशी संपर्क साधावा. त्यासाठी १८००-२२२-३६५ हा टोल-फ्री क्रमांक कार्यान्वित करण्यात आला आहे.''
- साहेबराव देसाई, सहाय्यक आयुक्त, अन्न प्रशासन, सोलापूर

No comments:
Post a Comment