२.१५ लाख पात्र ज्येष्ठांपैकी केवळ २३ हजारांनाच कार्ड; ९० टक्के वृद्ध उपचाराच्या लाभापासून वंचित
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : केंद्र सरकारच्या ७० वर्षे व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेल्या आयुष्मान भारत वयवंदना योजनेची सोलापूर जिल्ह्यात प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याचे चित्र समोर आले आहे. कॅशलेस उपचाराचे मोठे आश्वासन असतानाही जनजागृतीच्या अभावामुळे बहुतांश पात्र ज्येष्ठ नागरिक या योजनेपासून वंचित राहिले आहेत.
जिल्ह्यात ७० वर्षांवरील सुमारे २ लाख १५ हजार ज्येष्ठ नागरिक या योजनेसाठी पात्र आहेत. मात्र, गेल्या अनेक महिन्यांत केवळ २३ हजार लाभार्थ्यांनाच वयवंदना कार्ड मिळाले आहे. म्हणजेच ९० टक्क्यांहून अधिक पात्र ज्येष्ठ नागरिकांना अद्यापही या योजनेचा लाभ मिळालेला नाही.
या योजनेअंतर्गत हृदयरोग, कर्करोग, किडनी, यकृतासह विविध गंभीर आजारांवर वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे या योजनेसाठी कोणतीही उत्पन्नाची अट नसल्याने आर्थिक स्थितीची मर्यादा न ठेवता सर्व पात्र ज्येष्ठ नागरिकांना लाभ घेता येतो. सरकारी तसेच योजनेत समाविष्ट खासगी रुग्णालयांमध्येही मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध आहे.
मात्र, अनेक ज्येष्ठ नागरिकांना कार्ड काढण्याची प्रक्रिया माहित नसल्याने त्यांना उपचारासाठी स्वतःच्या खिशातून खर्च करावा लागत आहे. काही ठिकाणी खासगी रुग्णालयांमध्ये उपचारासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक भार सहन करावा लागत असल्याचीही तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
नागरिकांनी प्रशासनाने गावागावांत विशेष नोंदणी शिबिरे आयोजित करून, तसेच घरोघरी जाऊन या योजनेची माहिती देण्याची मागणी केली आहे. अन्यथा ज्येष्ठ नागरिकांसाठीची ही महत्त्वाकांक्षी योजना केवळ सरकारी आकडेवारीपुरतीच मर्यादित राहण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, आयुष्मान भारत योजनेचे जिल्हा समन्वयक डॉ. प्रवीण गुंजाळ यांनी सांगितले की, येत्या काळात आरोग्य कर्मचारी, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या माध्यमातून घरोघरी जाऊन जनजागृती केली जाणार आहे. जिल्ह्यातील एकाही पात्र ज्येष्ठ नागरिकाला उपचारासाठी पैसे भरावे लागू नयेत, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येतील.
पाच मिनिटांत असे काढा वयवंदना कार्ड
आयुष्मान अॅप डाउनलोड करा.
मोबाईल क्रमांक व ओटीपीद्वारे लॉगिन करा.
आधार क्रमांक टाकून माहिती शोधा.
फेस स्कॅन किंवा ओटीपीद्वारे ई-केवायसी पूर्ण करा.
कार्ड डाउनलोड करा. अडचण असल्यास महा-ई-सेवा केंद्राची मदत घ्या.
योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये
वर्षाला ५ लाख रुपयांपर्यंत कॅशलेस उपचार.
७० वर्षांवरील सर्व ज्येष्ठ नागरिक पात्र.
उत्पन्नाची कोणतीही अट नाही.
हृदयरोग, कर्करोग, किडनी, यकृतासह गंभीर आजारांवर उपचार.
सरकारी तसेच मान्यताप्राप्त खासगी रुग्णालयांमध्ये मोफत उपचाराची सुविधा.
No comments:
Post a Comment