सीसीटीव्हीच्या 'तिसऱ्या डोळ्याचा' दणका; १८२ नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई
एका दिवसात २.८२ लाखांचा ई-चलन दंड; मोबाईलवर बोलणे, ट्रिपल सीट आणि रिक्षा नियमभंगावर पोलिसांची करडी नजर
सोलापूर (कटूसत्य वृत्त) : शहरातील वाहतूक व्यवस्था शिस्तबद्ध करण्यासाठी आणि अपघातांना आळा घालण्यासाठी बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता प्रभावीपणे कार्यरत झाले आहेत. या 'तिसऱ्या डोळ्या'च्या मदतीने वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, दि. १९ जुलै रोजी तब्बल १८२ वाहनचालकांवर ई-चलनाद्वारे २ लाख ८२ हजार ५०० रुपयांचा दंड आकारण्यात आला.
शहरातील सुरक्षाव्यवस्था आणि वाहतूक नियंत्रण अधिक सक्षम करण्यासाठी विविध ठिकाणी ३३१ सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून वाहन चालविताना मोबाईलचा वापर करणे, दुचाकीवर तिघांनी प्रवास करणे (ट्रिपल सीट) तसेच रिक्षाच्या पुढील सीटवर नियमबाह्य प्रवासी बसविणे अशा प्रकारांवर वाहतूक पोलिसांकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.
पूर्वी वाहतूक पोलिसांना चकवा देणारे अनेक नियमभंग करणारे चालक आता सीसीटीव्हीच्या जाळ्यात अडकत असून, वाहतूक शाखेच्या या कारवाईमुळे वाहनचालकांमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणाऱ्या बेपर्वा वाहनचालकांना या कारवाईतून कठोर इशारा देण्यात आला आहे.
कारवाईचा आढावा
मोबाईलवर बोलत वाहन चालविणारे: १११
ट्रिपल सीट प्रवास करणारे: ५६
रिक्षाच्या पुढील सीटवर नियमबाह्य प्रवासी बसविणारे: १५
एकूण कारवाई: १८२ प्रकरणे
आकारलेला दंड: ₹२,८२,५००
सहायक पोलीस आयुक्त (वाहतूक) सुधीर खिराडकर यांनी सांगितले की, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नसून पुढील काळातही नियमितपणे सुरू राहणार आहे. नागरिकांनी दंडाच्या भीतीपोटी नव्हे, तर स्वतःच्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले.

No comments:
Post a Comment