झोन अधिकाऱ्यांच्या सह्यांशिवाय नगर अभियंत्यांनी काढली नालेसफाईची बिले; फेरतपासणी सुरू
सोलापूर (कटूसत्य वृत्त): महापालिकेच्या नालेसफाई कामातील कथित आर्थिक गैरव्यवहाराचे प्रकरण अधिकच गडद होत असून, काही बिले झोन अधिकाऱ्यांच्या आणि कनिष्ठ अभियंत्यांच्या आवश्यक सह्यांशिवायच मंजूर करून अदा करण्यात आल्याचा आरोप नगरसेवक अनंत जाधव यांनी केला आहे. त्यांच्या तक्रारीची दखल घेत महापालिका आयुक्तांनी संपूर्ण बिलांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत.
अनंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागील वर्षी झालेल्या नालेसफाईच्या कामामध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक अपहार झाल्याची तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर नगर अभियंता कार्यालयाने मंजूर केलेल्या बिलांची तपासणी सुरू असताना अनेक गंभीर तफावती समोर आल्या आहेत.
रणजित टूर्स अॅण्ड ट्रॅव्हल्स या एजन्सीने मौलाली चौक ते शास्त्रीनगर येथील दत्त मंदिराजवळील नाल्यापर्यंत १२ ते १५ मार्च २०२६ या कालावधीत नालेसफाईचे काम केल्याचे बिल सादर केले आहे. या बिलात दररोज १० तास काम झाल्याचा उल्लेख आहे. मात्र कामाची सुरुवात आणि समाप्तीची वेळ नमूद करण्यात आलेली नाही.
विशेष म्हणजे, हे बिल मंजूर करताना विभागीय अधिकारी क्रमांक ८ आणि नगर अभियंता कार्यालयातील सहायक अभियंत्यांच्या सह्या आहेत; मात्र संबंधित कनिष्ठ अभियंत्याची सही नाही. बिलातील तफावतीमुळे कनिष्ठ अभियंत्याने सही करण्यास नकार दिल्याची माहिती अनंत जाधव यांनी दिली. असे असतानाही संबंधित बिल मंजूर करून अदा करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
फेरतपासणीचे आयुक्तांचे आदेश
या संदर्भात अतिरिक्त आयुक्त वीणा पवार यांनी सांगितले की, नगरसेवक अनंत जाधव यांची तक्रार प्राप्त झाली असून आयुक्तांनी निविदा सनियंत्रण समितीला नालेसफाई प्रकरणातील सर्व बिलांची फेरतपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. तपासणीदरम्यान बिलांमध्ये तफावत आहे का, न झालेल्या कामांची बिले सादर करण्यात आली आहेत का, याची पडताळणी केली जाणार आहे. तसेच गैरप्रकार आढळल्यास संबंधित एजन्सीच्या देयकातून जादा अदा झालेली रक्कम वसूल केली जाईल.
पन्नास लाखांच्या वसुलीची मागणी
नालेसफाईच्या कामामध्ये वाहतूक खर्च आणि कामाच्या तासांमध्ये मोठ्या प्रमाणात विसंगती असल्याचा आरोप करत अधिकारी आणि ठेकेदारांच्या संगनमतातून आर्थिक अपहार झाल्याचा दावा अनंत जाधव यांनी केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि ठेकेदाराविरुद्ध फौजदारी गुन्हा दाखल करावा, तसेच ५० लाख रुपयांहून अधिकची जादा अदा झालेली रक्कम वसूल करावी, अशी मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे. चौकशीच्या भीतीने नगर अभियंता सारिका आकुलवार महिनाभराच्या रजेवर जात असल्याचाही दावा त्यांनी केला.
चौकट : काम १३ तासांचे, बिलात मात्र १२ तास
जाधव यांच्या म्हणण्यानुसार, काही बिलांमध्ये वेळापत्रकानुसार प्रत्यक्षात १३ तास काम झाल्याची नोंद असताना, एकूण कामाचा कालावधी मात्र १२ तास दाखविण्यात आला आहे. बहुतांश बिलांमध्ये अशाच प्रकारच्या विसंगती असल्याने प्रत्येक बिलाची स्वतंत्र चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
तसेच संबंधित एजन्सीला प्रतितास ४,८०० रुपये दर कोणत्या नियमांनुसार मंजूर करण्यात आला, याचाही तपास व्हावा, अशी मागणी त्यांनी केली. बाजारात जेसीबी किंवा पोकलेनचे भाडे साधारण २ ते २.५ हजार रुपये प्रतितास असताना जवळपास दुप्पट दराने बिले मंजूर करण्यात आल्याने आर्थिक हितसंबंध जपण्यासाठी हा निर्णय घेतल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
No comments:
Post a Comment