सोनम वांगचुक यांच्या लढ्याला सोलापुरात उत्स्फूर्त पाठिंबा; तीन ठिकाणी आंदोलने, राजीनाम्याची मागणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त): शिक्षण क्षेत्रातील कथित गैरव्यवहार आणि नीट (NEET) पेपरफुटी प्रकरणाच्या निषेधार्थ शिक्षणतज्ज्ञ सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला सोलापुरात विविध संघटना व संस्थांनी पाठिंबा दर्शविला. शहरातील तीन ठिकाणी निदर्शने, अन्नत्याग आंदोलन आणि लाक्षणिक उपोषण करण्यात आले. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पूनम गेट येथे निदर्शने करण्यात आली. यावेळी कार्यकर्त्यांनी "सोनम वांगचुक आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं", "शिवसेना जिंदाबाद" तसेच "केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा धिक्कार असो" अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नीट पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली. आंदोलनात जिल्हाप्रमुख प्रताप चव्हाण, महानगरप्रमुख महेश धाराशिवकर, विष्णू कारमपुरी, संजय पौळ, दत्तात्रय गणेशकर, सुरेश जगताप आदी उपस्थित होते.
दरम्यान, भारताचा लोकशाहीवादी युवा महासंघ (डीवायएफआय) यांच्या वतीने पूनम गेट येथे २४ तासांचे अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात आले. जिल्हाध्यक्ष विक्रम कलबुर्गी आणि राज्य सचिव दत्ता चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. शुक्रवारी सकाळी १० वाजता सुरू झालेल्या आंदोलनात केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली. प्रशासनाने २४ तासांत मागण्यांची दखल घेतली नाही, तर आंदोलन बेमुदत सुरू ठेवण्यात येईल, असा इशारा जिल्हा सचिव अॅड. अनिल वासम यांनी दिला. यावेळी जिल्हा सहसचिव विजय हरसुरे, सनी शेट्टी, नरेश गुल्लापल्ली यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
याशिवाय, अहिल्याबाई शिक्षण संकुलातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनीही सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले. इस्माईल उर्दू स्कूल, अहिल्याबाई प्रशाला, अहिल्याबाई कनिष्ठ महाविद्यालय आणि डॉ. द्वारकादास कोटणीस शाळेतील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी उपोषणात सहभाग नोंदविला.
यावेळी शिक्षण व्यवस्थेत आवश्यक सुधारणा करून प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, समान आणि सर्वसमावेशक शिक्षण मिळावे, ही काळाची गरज असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले. शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असून, शिक्षण क्षेत्रात सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने पुढे येण्याची आवश्यकता असल्याचेही त्यांनी सांगितले.

No comments:
Post a Comment