नातेपुते, माळशिरस येथे अन्न व औषध प्रशासनाची कारवाई
५३ हजारांचा पॅकेज्ड वॉटर व ज्यूस साठा जप्त, व्यवसाय बंदचे आदेश
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर कार्यालयास मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे अन्न व औषध प्रशासनाने नातेपुते, ता. माळशिरस येथील मे. सत्यवेल अॅग्रोटेक प्रायव्हेट लिमिटेड या आस्थापनेवर अचानक छापा टाकून ५३ हजार रुपये किंमतीचा १३८४ लिटर पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूसचा साठा जप्त केला. तसेच तपासणीवेळी आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता होईपर्यंत आस्थापनेस तत्काळ व्यवसाय बंद करण्याचे निर्देश देण्यात आले, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त साहेबराव देसाई यांनी दिली.
दि. १८ जुलै २०२६ रोजी अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांनी सदर आस्थापनेला भेट देऊन तपासणी केली. यावेळी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर व मँगो ज्यूस या अन्नपदार्थांचे ०२ नमुने घेण्यात आले. उर्वरित पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटरचे ५८४ लिटर व मँगो ज्यूसचे ८०० लिटर, असे एकूण १३८४ लिटर, किंमत रु. ५३,०००/- चा साठा जप्त करण्यात आला.
सदर साठ्यावर लेवल दोष, कमी दर्जा असल्याचा संशय व अन्न सुरक्षा व मानदे कायद्याचे ‘परिशिष्ट IV’ (Schedule IV) मधील नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. त्यामुळे सदरचा साठा जप्त करून पुढील आदेशापर्यंत विक्रेत्याच्या आस्थापनामध्येच सुरक्षित ठेवण्यात आला आहे.
ही कारवाई आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, मुंबई तुकाराम मुंढे व सह आयुक्त (पुणे विभाग) दि. वा. भोगावडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक आयुक्त (अन्न) सा. ए. देसाई, अन्न सुरक्षा अधिकारी मंगेश म. लवटे व सहकारी अन्न सुरक्षा अधिकारी रमाकांत पाटील यांच्या पथकाने पूर्ण केली.
अन्न व औषध प्रशासनाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, अन्नपदार्थ खरेदी करताना एफएसएसएआय परवाना, उत्पादन व मुदत संपण्याची तारीख, बॅच क्रमांक तपासूनच खरेदी करावा. संशयास्पद अन्नपदार्थांबाबत प्रशासनाला माहिती द्यावी.
.png)
No comments:
Post a Comment