सिंहगड पब्लिक स्कूल, केगावचा १६ वा स्थापना दिन उत्साहात
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगाव, सोलापूर येथे विद्यालयाचा १६ वा स्थापना दिन उत्साहपूर्ण आणि प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. "ज्ञान, संस्कार आणि गुणवत्ता" या मूल्यांचा वारसा जपत विद्यालयाने गेल्या १६ वर्षांत केलेल्या शैक्षणिक वाटचालीचा गौरव यावेळी करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावित्रीबाई फुले शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव तथा सिंहगड इन्स्टिट्यूट, केगाव, सोलापूरचे कॅम्पस डायरेक्टर संजय नवले उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व सरस्वती पूजनाने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते केक कापून स्थापना दिनाचा आनंद साजरा करण्यात आला.
अध्यक्षीय भाषणात संजय नवले यांनी संस्थेच्या यशस्वी वाटचालीत शिक्षक, कर्मचारी, विद्यार्थी आणि पालकांचे योगदान मोलाचे असल्याचे सांगितले. शिक्षणासोबतच शिस्त, मूल्याधिष्ठित जीवन, सामाजिक जाणीव आणि राष्ट्रनिर्मितीची भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजविण्याचे कार्य सिंहगड शिक्षण संस्था सातत्याने करत असल्याचे त्यांनी नमूद केले. आगामी काळातही उत्कृष्टतेचा हा प्रवास अधिक जोमाने सुरू राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी शिक्षक वसीम इनामदार यांनी संस्थेच्या गौरवशाली प्रवासाचा आढावा घेत शिक्षण, क्रीडा, सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव केला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संस्थेने दिलेल्या योगदानाबद्दल त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली.
अमोल नवले यांनी आपल्या मनोगतात संस्थापक प्रा. एम. एन. नवले यांच्या दूरदृष्टीचा उल्लेख करत गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या माध्यमातून सिंहगड संस्थेने हजारो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविल्याचे सांगितले. संस्थेच्या प्रगतीमागील शिक्षक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या योगदानाचे त्यांनी कौतुक केले.
२८ जून २०१० रोजी संस्थापक प्रा. एम. एन. नवले यांनी सिंहगड पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, केगावची स्थापना केली. विद्यालयाने स्थापनेपासून सातत्याने शैक्षणिक गुणवत्तेला प्राधान्य देत सीबीएसई बोर्ड परीक्षेत १०० टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. आधुनिक अध्यापन पद्धती, क्रीडा, सांस्कृतिक उपक्रम, विज्ञान-तंत्रज्ञान आणि मूल्याधिष्ठित शिक्षणाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जात आहे.
विद्यालयाचा विस्तीर्ण, हिरवाईने नटलेला आणि पर्यावरणपूरक परिसर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी शिक्षणाचे केंद्र ठरत असून, स्वच्छ व निसर्गरम्य वातावरणात विद्यार्थ्यांना आनंददायी शिक्षणाचा अनुभव मिळत आहे.
पालकांचा विश्वास, शिक्षकांचे समर्पण आणि विद्यार्थ्यांची जिद्द यांच्या बळावर विद्यालयाची प्रगती अधिक भक्कम होत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. गुणवत्तापूर्ण शिक्षणासोबतच संस्कारक्षम व जबाबदार नागरिक घडविण्याचा संकल्प विद्यालयाने पुन्हा एकदा व्यक्त केला.
कार्यक्रमास विद्यालयाच्या प्राचार्या शाहीन शेख, उपप्राचार्य प्रकाश नवले, उपप्राचार्या निकहत शेख, सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment