कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालयात वृक्षारोपण
बार्शी (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजऱ्या करण्यात येणाऱ्या कृषी दिनाचे औचित्य साधून कर्मवीर डॉ. मामासाहेब जगदाळे कृषी महाविद्यालय, बार्शी येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे. डी. जाधव हे होते.
प्राचार्य डॉ. जाधव यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात वसंतराव नाईक यांच्या कृषी विकासातील योगदानाचा गौरवपूर्ण उल्लेख करत पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन ही काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. प्रत्येकाने किमान एक वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करावा, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महाविद्यालयाचे कार्यालयीन अधीक्षक श्री. मोरे टी. एस. हे प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमादरम्यान महाविद्यालय परिसरात विविध वृक्षांची लागवड करण्यात आली. प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी डॉ. एस. एस. शेंडे, प्रा. गणेश जाधव, डॉ. एम. डी. गुरव, डॉ. एस. एस. कुलकर्णी, डॉ. ए. वाय. रणवरे तसेच प्रा. आशा आदलिंगे यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कु. साक्षी इनामे या विद्यार्थिनीने केले, तर आभार प्रदर्शन प्रा. एस. एम. शेळके यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:
Post a Comment