करमाळा शहरात पल्स पोलिओ मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद; २,१४३ बालकांना पोलिओ डोस
करमाळा (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र शासनाच्या वतीने तसेच करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातून रविवारी (२८ जून) करमाळा शहरात पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओचा डोस पाजण्यासाठी शहरातील विविध भागांत एकूण १६ केंद्रांवर विशेष व्यवस्था करण्यात आली होती. या मोहिमेला पालकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
करमाळा उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतीजा वेदपाठक यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम यशस्वीपणे पार पडली. यासाठी उपजिल्हा रुग्णालय, बस स्थानक, सिद्धार्थ नगर, केतूर नाका, रावगाव नाका (सुमंत नगर), सेंट्रल स्कूल, वेताळ पेठ, नगर परिषद दवाखाना, डॉ. भांबळ हॉस्पिटल, फंड गल्ली, मेन रोड येथील नगर परिषद शाळा, मौलाली माळ, केवारे हॉस्पिटल, गणेश नगर, कन्या शाळा, एसटी कॉलनी आदी ठिकाणी पोलिओ बूथ उभारण्यात आले होते. तसेच शहरातील विविध भागांमध्ये फिरते पथकही कार्यरत ठेवण्यात आले होते.
या मोहिमेत आतापर्यंत २,१४३ बालकांना पोलिओचा डोस देण्यात आला असून ८५.२७ टक्के उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. उर्वरित पात्र बालकांपर्यंत पोहोचण्यासाठी पुढील पाच दिवस घरभेटीद्वारे लसीकरण मोहीम सुरू राहणार असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रतीजा वेदपाठक यांनी दिली.
यावेळी आरोग्य विभागातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका तसेच आरोग्य कर्मचाऱ्यांनी मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी परिश्रम घेतले. शून्य ते पाच वर्षे वयोगटातील कोणतेही बालक पोलिओ डोसपासून वंचित राहू नये, असे आवाहनही आरोग्य विभागाकडून करण्यात आले आहे.

No comments:
Post a Comment