सोन्याचे दागिने लंपास करणारा तोतया पोलीस नातेपुते पोलीस ठाण्याच्या ताब्यात
नातेपुते (कटूसत्य वृत्त):- स्वतःला पोलिस असल्याचे भासवून, सरकारने अंगावर सोने घालण्यास बंदी घातली आहे, अशी खोटी बतावणी करत ७६ वर्षीय वृद्ध महिलेचे १ लाख ६६ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास करणाऱ्या मुख्य आरोपीला नातेपुते पोलिसांनी अटक केली.९ जून २०२६ रोजी दुपारी १२:३० वाजण्याच्या सुमारास फिर्यादी विमल शंकर जैन (रा. नातेपुते) या एसटी स्टँड जवळील अहिल्यादेवी होळकर पुतळ्याजवळ उभ्या असताना मोटारसायकलवरून आलेल्या दोन अनोळखी व्यक्तींनी स्वतःला पोलिस असल्याचे सांगितले. सरकारने अंगावर सोने परिधान करण्यास बंदी घातल्याचे खोटे सांगून त्यांनी वृद्ध महिलेला भीती दाखवली. सुरक्षिततेच्या नावाखाली गळ्यातील सोन्याचे लॉकेट पिशवीत ठेवण्यास सांगत हातचलाखीने दोन सोन्याचे लॉकेट चोरून दोघे पसार झाले. या प्रकरणी नातेपुते पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. चोरीस गेलेल्या दागिन्यांमध्ये २१ ग्रॅम वजनाचे बदाम असलेले सोन्याचे लॉकेट (किंमत ८१ हजार रुपये) आणि २२ ग्रॅम वजनाचे त्रिकोण लोगो असलेले सोन्याचे लॉकेट (किंमत ८५ हजार रुपये) असा एकूण १ लाख ६६ हजार रुपयांचा ऐवज होता. सपोनी विशाल वायकर यांनी गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी तांत्रिक तपास व गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानुसार मुख्य आरोपी शहाजूर अफसर इराणी (वय ५०, रा. मंगल नगर, अटारी रोड, कल्याण) याला खडकपाडा पोलिसांच्या मदतीने कल्याण येथून ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, अपर पोलिस अधीक्षक विजय कबाडे व उपविभागीय पोलिस अधिकारी संतोष वाळके यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि विशाल वायकर
सफौ. देविदास धोत्रे, पोलीस नाईक राकेश लोहार, रणजीत मदने, असलम शेख, गणेश कापसे तसेच खडकपाडा पोलीस ठाण्याचे (कल्याण) पोलीस उपनिरीक्षक भूषण देवरे, सफौ. सुधीर पाटील, पोपट दुलगुंड यांनी पार पाडली.

No comments:
Post a Comment