गुरुपौर्णिमा हेच भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली उत्सव- धानय्या मठपती - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, July 30, 2026

गुरुपौर्णिमा हेच भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली उत्सव- धानय्या मठपती

 गुरुपौर्णिमा हेच भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली उत्सव- धानय्या मठपती




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गुरुपौर्णिमा हेच भारतीय ज्ञानपरंपरेचा गौरवशाली उत्सव आहे . व्यास मुनींनी पहिल्यांदा ज्ञान देण्यास प्रारंभ केला म्हणून व्यासपौर्णिमा असेही संबोधले जाते.महर्षी व्यासांनी जगातील ज्ञानपरंपरेला सुसूत्र स्वरूप देण्याचे महान कार्य केले. त्यामुळे भारतीय संस्कृतीत गुरुपौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व असल्याचे प्रतिपादन कन्नड प्रवचनकार वेदमूर्ती धानय्या मठपती यांनी केले.
निलमनगर येथील नेताजी सुभाषचंद्र बोस शिक्षण संकुलात आयोजित गुरुपौर्णिमेच्या कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार होते. व्यासपीठावर संस्थेच्या खजिनदार ललिता कुंभार, सेवानिवृत्त प्राचार्य सुभाष धुमशेट्टी, विजयकुमार हुल्ले, प्राचार्य रविशंकर कुंभार, मुख्याध्यापिका विजयालक्ष्मी कुंभार, मुख्याध्यापिका वैशाली कुंभार, पर्यवेक्षक गौरीशंकर आळंगे, शालेय समिती सदस्य सिद्धाराम कुंभार आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रथम श्री वीरतपस्वी चन्नवीर शिवाचार्य महास्वामीजी व श्री तपोरत्नं योगिराजेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अण्णाराव कुंभार व ललिता कुंभार यांनी वेदमूर्ती धानय्या मठपती यांचे पाद्यपूजन केले.
 मठपती पुढे म्हणाले, गुरु हा अज्ञानरूपी अंधकार दूर करुन ज्ञानामृताचा वर्षाव करणारा सर्वश्रेष्ठ मार्गदर्शक आहे. जसा परिसाच्या स्पर्शाने लोखंडाचे सोन्यात रूपांतर होते, त्याचप्रमाणे सद्गुरूंच्या सान्निध्याने माणसाचे जीवन संस्कारित, तेजस्वी आणि अर्थपूर्ण बनते. पृथ्वीचे कागद, वनराईची लेखणी आणि सप्तसमुद्रांची शाई केली तरी गुरुचे गुण शब्दांत वर्णन करता येणार नाहीत असे सांगत त्यांनी गुरुचे महत्त्व अधोरेखित केले. संत ज्ञानेश्वर, संत गोरा कुंभार, संत नामदेव, विसोबा खेचर यांसह अनेक संतांच्या उदाहरणातून त्यांनी गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व स्पष्ट केले. ईश्वर हा अणुरेणू, तृण-काष्ठ आणि चराचर सृष्टीच्या प्रत्येक कणात व्यापून असून, त्याचा साक्षात्कार गुरुच्या कृपेनेच होतो असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष अण्णाराव कुंभार म्हणाले, गुरू म्हणजे ज्ञानाचा दीप, जीवनाला नवी दिशा देणारा मार्गदर्शक आणि अंधारातून प्रकाशाकडे नेणारी दिव्य शक्ती होय. गुरुच्या आध्यात्मिक सामर्थ्यामुळे मनःशांती, आत्मविश्वास आणि जीवनाला योग्य दिशा मिळते. आत्मचिंतन करणाऱ्या शिष्यावर गुरुची कृपादृष्टी सदैव राहते. गुरु सर्वांना समभावाने वागवतात. ज्यांच्या पाठीशी गुरुबल असते, त्या शिष्याचे जीवन कल्याणमय होते. त्यामुळे प्रत्येकाने गुरुचे सान्निध्य लाभावे आणि त्यांच्या मार्गदर्शनाचा स्वीकार करावा. यावेळी राजराजेश्वरी संगीत विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी भक्तिगीते सादर केली. 
याप्रसंगी भारती पाटील, किरण कदम, विशाल खाडे ,प्रशांत स्वामी आदींनी गुरुपौर्णिमेचे महत्त्व सांगितले. 
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शितलकुमार पाटील यांनी केले तर विश्वाराध्य मठपती यांनी आभार मानले. शांतीपाठ व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.यावेळी संस्थेच्या सर्व शाखेतील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages