सोलापूर महानगरपालिकेत IWMS प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीचा गौरव सोहळा संपन्न
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर महानगरपालिकेतील विकासकामांचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि डिजिटल पद्धतीने करण्यासाठी राबविण्यात आलेल्या इंटेलिजंट वर्क्स मॅनेजमेंट सिस्टीम (IWMS) या आधुनिक प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दलचा गौरव सोहळा आज क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले सभागृहात महापौर श्री. विनायक दादा कोंडयाल यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या कार्यक्रमास उपमहापौर सौ. ज्ञानेश्वरी देवकर, स्थायी समिती सभापती सौ. रंजीता ताई चाकोते, सभागृह नेते श्री. नरेंद्रजी काळे, शहराध्यक्ष तथा नगरसेवक सौ. रोहिणी ताई तळवळकर, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नगर अभियंता सौ. सारिका अकुलवार, प्रकाश दिवाणजी यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, अभियंते व कर्मचारी उपस्थित होते. तसेच IWMS प्रणालीचे विकसक असलेल्या Innomise Technologies Pvt. Ltd. चे कार्यकारी संचालक श्री. रोहन अजगेकर यांनी पॉवर पॉईंट सादरीकरणाद्वारे प्रणालीची वैशिष्ट्ये आणि कार्यपद्धतीची सविस्तर माहिती दिली.
IWMS ही विकासकामांच्या संपूर्ण जीवनचक्राचे डिजिटल व्यवस्थापन करणारी एकात्मिक प्रणाली असून, कामांचे नियोजन, अंदाजपत्रक तयार करणे, प्रशासकीय व तांत्रिक मान्यता, निविदा प्रक्रिया, कार्यादेश, ई-मोजणी पुस्तिका (e-Measurement Book), बिल प्रक्रिया, कामांच्या प्रगतीचे निरीक्षण तसेच विविध व्यवस्थापकीय अहवाल तयार करणे या सर्व प्रक्रिया एकाच डिजिटल व्यासपीठावर उपलब्ध करून देते.
या प्रणालीमुळे सोलापूर महानगरपालिकेतील विकासकामांच्या व्यवस्थापनात अधिक गती, अचूकता आणि पारदर्शकता निर्माण झाली आहे. कागदाधारित प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घट होऊन मंजुरी प्रक्रिया अधिक सुलभ झाली असून, अधिकारी, अभियंते आणि कंत्राटदारांना आवश्यक माहिती, बिलांची स्थिती तसेच कामांचा प्रगती आढावा ऑनलाइन उपलब्ध होत आहे. यामुळे प्रशासनातील कार्यक्षमता वाढून निर्णय प्रक्रिया अधिक परिणामकारक होण्यास मदत होत आहे.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी IWMS प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीबद्दल समाधान व्यक्त करत, सोलापूर महानगरपालिकेच्या डिजिटल प्रशासनाच्या दिशेने हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असल्याचे नमूद केले. तसेच भविष्यातही तंत्रज्ञानाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक दर्जेदार, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्याचा महानगरपालिकेचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी IWMS प्रणालीच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी योगदान देणाऱ्या सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी, कंत्राटदार तसेच Innomise Technologies Pvt. Ltd. च्या संपूर्ण टीमचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. उपस्थित सर्व मान्यवरांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.

No comments:
Post a Comment