१२ गावांतील नागरिकांना लवकरच मिळणार प्रॉपर्टी कार्ड - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 3, 2026

१२ गावांतील नागरिकांना लवकरच मिळणार प्रॉपर्टी कार्ड

 १२ गावांतील नागरिकांना लवकरच मिळणार प्रॉपर्टी कार्ड

नगरभूमापन मालमत्ता हक्कांना अधिकृत स्वरूप देणारी मोहीम- महापौर कोंड्याल




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महानगरपालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या १२ गावांतील नागरिकांना मालमत्ता पत्रक (प्रॉपर्टी कार्ड) उपलब्ध करून देण्यासाठी सुरू असलेल्या नगरभूमापन मोहिमेच्या कामाचा आढावा बुधवारी महापालिकेच्या कॉन्सिल हॉलमध्ये घेण्यात आला.
             महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीस उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, स्थायी समिती सभापती रंजीता चाकोते, आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अधीक्षक भूमी अभिलेख दादासाहेब घोडके, उपअधीक्षक सचिन पवार, मॅपेक्स एजन्सीचे प्रतिनिधी सचिन कांबळे, सहायक संचालक नगर रचना समीर शितोळे, कार्यकारी अभियंता नीलकंठ मठपती, उपअभियंता आनंद जोशी यांच्यासह नगरसेवक उपस्थित होते.
         बैठकीत नगरभूमापन प्रक्रियेचे सादरीकरण करण्यात आले. उपअधीक्षक सचिन पवार यांनी सर्वेक्षणाची उद्दिष्टे, नागरिकांना होणारे फायदे, आवश्यक कागदपत्रे आणि पुढील कार्यपद्धती याबाबत माहिती दिली. सर्वेक्षणातून तयार होणाऱ्या डिजिटल नकाशांमुळे नागरिकांना ऑनलाइन प्रॉपर्टी कार्ड उपलब्ध होणार असून मालमत्तेसंबंधी वाद कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच प्रॉपर्टी कार्ड व सनद मिळाल्यानंतर बँक कर्ज, आर्थिक व्यवहार आणि विविध शासकीय योजनांचा लाभ घेणे सुलभ होणार आहे.
        यावेळी महापौर कोंड्याल यांनी नगरसेवकांनी नागरिक आणि नगरभूमापन कर्मचाऱ्यांमध्ये समन्वय साधून मोहीम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच काम विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी मनुष्यबळ वाढविण्याच्या सूचनाही दिल्या.
आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी नगरभूमापन विभागाला महापालिकेच्या नगररचना व मालमत्ता विभागामार्फत समन्वय अधिकारी उपलब्ध करून दिले जातील, असे सांगत सर्वेक्षणाचे काम प्रभावीपणे पूर्ण करण्याचे निर्देश दिले. यावेळी नगरसेवक प्रशांत पल्ली,  शिवानंद पाटील,  नारायण बनसोडे, अनंत जाधव, नगरसेविका अर्चना वडनाल यांनी देखील सूचना केल्या
          या मोहिमेसाठी महापालिकेने यापूर्वीच ५ कोटी रुपयांचा निधी नगरभूमापन विभागाकडे वर्ग केला असून, अत्याधुनिक ड्रोन व जीआयएस तंत्रज्ञानाच्या साहाय्याने सर्वेक्षणाचे काम सुरू आहे.


आवश्यक कागदपत्रे

नगरभूमापन मोहिमेसाठी ७/१२ उतारा, महापालिका कर पावती, खरेदीखत, सक्षम प्राधिकाऱ्यांचे आदेश, डिम्ड कन्व्हेयन्स, सोसायटी नोंदणी प्रमाणपत्र, मंजूर बांधकाम नकाशा, वारसा हक्क प्रमाणपत्र, वीज बिल, पाणीपट्टी व आधार कार्ड आदी कागदपत्रे आवश्यक असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages