लोकमंगल नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांकडून ‘पोषणाचे महत्त्व’ जनजागृती कार्यक्रम
धाराशिव (कटूसत्य वृत्त):- श्रीराम ग्रामीण संस्था व विकास प्रतिष्ठान अंतर्गत संचालित लोकमंगल नर्सिंग कॉलेज, वडाळा (ता. उत्तर सोलापूर) येथील विद्यार्थ्यांनी काटी गावात ‘समृद्ध गाव योजना’ अंतर्गत “Importance of Nutrition (पोषणाचे महत्त्व)” या विषयावर आरोग्य शिक्षण कार्यक्रमाचे आयोजन केले.
या कार्यक्रमाचा उद्देश ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये संतुलित आहार, पोषण आणि निरोगी जीवनशैलीबाबत जागरूकता निर्माण करणे हा होता. विद्यार्थ्यांनी गावातील प्रत्येक घरी जाऊन नागरिकांना कार्यक्रमासाठी निमंत्रित केले तसेच पोषणयुक्त आहाराचे महत्त्व समजावून सांगितले. त्यानंतर गावाच्या मुख्य चौकात रॅली काढून घोषणाबाजी (स्लोगन) करत जनजागृती करण्यात आली.
विद्यार्थ्यांनी संतुलित आहार, फळे, भाज्या, कडधान्ये, दुग्धजन्य पदार्थ यांचे आरोग्यासाठी असलेले महत्त्व, कुपोषणाचे दुष्परिणाम तसेच योग्य आहारामुळे होणारे आरोग्यदायी फायदे याबाबत सविस्तर माहिती दिली. पोषणाविषयी जनजागृती ही निरोगी समाजाच्या निर्मितीसाठी अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या उपक्रमास लोकमंगल नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य बाळासाहेब बिरादार, इनामदार सर, फौजिया मुल्ला मॅडम, महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी तसेच गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित ग्रामस्थांनी विद्यार्थ्यांच्या या सामाजिक व आरोग्यविषयक जनजागृती उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामीण भागातील नागरिकांपर्यंत आरोग्य व पोषणविषयक माहिती पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची गरज असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.
.png)
No comments:
Post a Comment