पावसाळ्यापूर्वी मनपाची तयारी; आयुक्त डॉ. ओम्बासे यांची नाल्यांची पाहणी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील नालेसफाई, रुंदीकरण व पावसाच्या पाण्याचा निचरा सुरळीत होण्यासाठी सुरू असलेल्या कामांची पाहणी महापालिका आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी आज नीलम नगर परिसरातील १२ नंबर नाल्यावर भेट देऊन केली.
यावेळी प्रभागातील नगरसेविका कलावती गदगे व कविता गज्जम यांनी नाल्याच्या विद्यमान लेआउटमध्ये काही त्रुटी असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी सांगितले की, नाल्याचे नैसर्गिक वळण सध्या वाकडे-तिकडे झाल्याने परिसरात पावसाचे पाणी साचण्याची समस्या निर्माण होते. त्यामुळे नाल्याचे अलाइनमेंट तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने सरळ करून पावसाचे पाणी रस्त्यावर न साचता नाल्यामार्फत सुरळीतपणे पुढे वाहून जाईल, यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येईल.
पाहणीदरम्यान नगरसेवकांनी निदर्शनास आणून दिले की, पुढील भागात जाधव यांच्या जमिनीशेजारी जाणारा नाला काही प्रमाणात बंद करण्यात आल्याचे आढळून येत आहे. यावर आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना नकाशानुसार नाल्याची साफसफाई व रुंदीकरण करण्याचे निर्देश दिले. तसेच कामात कोणत्याही व्यक्तीकडून अडथळा निर्माण झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि आवश्यकतेनुसार कर्मचाऱ्यांना पोलिस संरक्षण उपलब्ध करून द्यावे, असेही स्पष्ट निर्देश त्यांनी दिले. यासंदर्भात कंत्राटदाराकडून आवश्यक माहिती घेऊन नगर अभियंत्यांना तत्काळ कळविण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.
यानंतर आयुक्तांनी सुमय्या नगर येथील जैतुनबी शाळेजवळील पावसाळी नाल्याची पाहणी केली. या ठिकाणी शाळेच्या डाव्या बाजूने जाणाऱ्या बंदिस्त पावसाळी नाल्याचे इनलेट पॉईंट तसेच नाल्याच्या मार्गावर अतिक्रमण झाल्याचे निदर्शनास आले. यावेळी शाळेचे प्रतिनिधी एम. डी. शेख यांनी नाल्याचा मार्ग बदलून तो उजव्या बाजूच्या लोकवस्तीतील रस्त्यातून नेण्याची विनंती केली.
मात्र आयुक्त डॉ सचिन ओम्बासे यांनी स्पष्ट केले की, सन २०११ च्या अधिकृत नकाशानुसार संबंधित नाला शाळेच्या डाव्या बाजूने व शाळेच्या मागील भागातून जात होता. तसेच केंद्र शासनानेही याच मूळ आराखड्यानुसार नाला रुंदीकरणासाठी मंजुरी दिलेली असल्याने नाल्याची दिशा बदलणे शक्य नाही.
यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार यांनीही संबंधित शाळेकडून नाल्याच्या जागेवर अतिक्रमण झाल्याचे सांगितले व नाला मूळ आराखड्यानुसार शाळेच्या डाव्या बाजूनेच जात असल्याचे स्पष्ट केले. त्यावर आयुक्तांनी शाळा प्रशासनास अतिक्रमण हटवून नाल्याच्या बांधकाम व साफसफाईसाठी महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन केले.
तसेच शाळेच्या सुरक्षिततेचा विचार करून, इतर ठिकाणी खुला नाला असला तरी शाळेसमोरील भागात सुरक्षिततेच्या दृष्टीने बंदिस्त नाल्याची रचना करता येईल, असेही आयुक्तांनी सांगितले.
यावेळी नगर अभियंता सारिका आकुलवार, सहाय्यक नगर अभियंता प्रकाश दिवाणजी, कनिष्ठ अभियंता मनोज जाधव, नगरसेविका कलावती गदगे, कविता गज्जम, बसवराज केन्नाळकर, विभागीय कार्यालय क्र. ४ चे अधीक्षक नंदकुमार गजधनी, कनिष्ठ अभियंता सूफियान पठाण, प्राजक्ता वडतिले, महेंद्र बोटे तसेच संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
"पावसाळ्यापूर्वी शहरातील सर्व प्रमुख नाल्यांची साफसफाई, अतिक्रमण निर्मूलन व आवश्यक रुंदीकरणाची कामे वेळेत पूर्ण करून नागरिकांना पाणी तुंबण्याच्या समस्येपासून दिलासा देण्यासाठी प्रशासन कटिबद्ध आहे. कोणत्याही प्रकारचा अडथळा खपवून घेतला जाणार नाही," असे आयुक्त डॉ सचिन ओबासे यांनी यावेळी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment