आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; कामकाज ठप्प - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; कामकाज ठप्प

 आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप सुरू; कामकाज ठप्प



सोलापूर (कटूसत्य वृत्त):- महाराष्ट्र राज्यातील मोटार वाहन विभागातील कर्मचाऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्या आणि न्याय्य हक्कांसाठी मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेच्या वतीने मंगळवारपासून राज्यव्यापी बेमुदत संपाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनात सोलापूर प्रादेशिक परिवहन (आरटीओ) कार्यालयातील कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले असून कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर निदर्शने करत शासनाविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.

सकाळी दहा वाजल्यापासून सुरू झालेल्या या आंदोलनामुळे सोलापूर आरटीओ कार्यालयातील कामकाजावर मोठा परिणाम झाला. वाहन परवाना, वाहन नोंदणी, वाहन हस्तांतरण, परवाना नूतनीकरण तसेच इतर प्रशासकीय सेवा ठप्प झाल्याने विविध कामांसाठी आलेल्या नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला.

कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्यांमध्ये विभागाचे सेवा प्रवेश नियम तातडीने जाहीर करणे, मंजूर आकृतीबंधाची अंमलबजावणी करणे, ५६ कर्मचाऱ्यांची मागे घेतलेली पदोन्नती पूर्ववत करणे तसेच प्रशासकीय पदांवरील प्रलंबित बढत्या त्वरित देणे यांचा समावेश आहे. याशिवाय बढतीपूर्वी घेतली जाणारी नियमबाह्य परीक्षा रद्द करणे, १०-२०-३० वर्षांचे कालबद्ध सेवांतर्गत लाभ लागू करणे आणि कर्मचाऱ्यांच्या पदांचे सुधारित नामकरण करणे या मागण्याही शासनाकडे मांडण्यात आल्याचे मोटार वाहन विभाग कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मेहबूब जमादार यांनी सांगितले.

यावेळी बोलताना जमादार म्हणाले की, मागण्यांसंदर्भात अनेकवेळा निवेदने देऊन तसेच सातत्याने पाठपुरावा करूनही प्रशासनाकडून कोणताही सकारात्मक निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे अखेर बेमुदत संपाचा मार्ग स्वीकारावा लागला. हा लढा कर्मचाऱ्यांच्या स्वाभिमान, सेवा हक्क आणि आर्थिक सुरक्षिततेसाठी असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

सोलापूर आरटीओ कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी संपात सक्रिय सहभाग नोंदवत शासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. न्याय्य मागण्यांवर निर्णय होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, या संपामुळे आरटीओ प्रशासनासमोर कामकाज सुरळीत ठेवण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले असून नागरिकांच्या कामांवरही त्याचा परिणाम होत आहे.

यावेळी मनीष सुरवसे, सी. बी. कुलकर्णी, पंकज पवार, शुकूर मुजावर, जयश्री पवार, ज्योती कांबळे, सचिन खांडेकर, अंकुल टकले आदी कर्मचारी उपस्थित होते.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages