राष्ट्रमाता जिजाऊ : हिंदवी स्वराज्याच्या प्रेरणाशक्ती
- प्रा. डॉ. आनंद गिरी
छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची जडणघडण करणाऱ्या आणि हिंदवी स्वराज्याच्या संकल्पनेला प्रेरणा देणाऱ्या राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब या भारतीय इतिहासातील एक अद्वितीय व्यक्तिमत्त्व आहेत. शिवरायांना केवळ जन्म देणारी माता म्हणून नव्हे, तर स्वराज्याची बीजे रुजविणारी दूरदृष्टीची राष्ट्रनिर्माती म्हणून त्यांचे योगदान अतुलनीय आहे.
इ.स. १६२९ ते १६३६ हा काळ जिजाऊंच्या आयुष्यातील अत्यंत संघर्षमय आणि कसोटीचा काळ होता. निजामशाही, आदिलशाही आणि मोगल सत्तांमधील संघर्षात शहाजीराजे भोसले सातत्याने राजकीय घडामोडींमध्ये गुंतले होते. निजामशाहीचा अस्त झाल्यानंतर शहाजीराजेंनी कर्नाटकात कार्यक्षेत्र निवडले, तर जिजाऊ माँसाहेब आणि बाल शिवाजी यांना पुण्याच्या जहागिरीत ठेवण्यात आले. जहागिरीची जबाबदारी सांभाळण्याबरोबरच शिवाजी महाराजांच्या व्यक्तिमत्त्वाची घडण करण्याचे महत्त्वाचे कार्य जिजाऊंनी हाती घेतले.
जिजाऊंचे माहेर देवगिरीच्या यादव घराण्याशी संबंधित होते, तर सासर उदयपूरच्या सिसोदिया राजवंशाचा वारसा सांगणारे होते. या दोन्ही घराण्यांचा सांस्कृतिक आणि शौर्यपूर्ण वारसा त्यांनी शिवरायांमध्ये रुजविला. जिजाऊंचा जन्म इ.स. १५९५ मध्ये निजामशाहीतील पराक्रमी सरदार लखुजी जाधवराव यांच्या घरी झाला. पुढे इ.स. १६०५ मध्ये त्यांचा विवाह शहाजीराजे भोसले यांच्याशी झाला.
जिजाऊंच्या आयुष्यात अनेक दुःखद आणि संघर्षमय घटना घडल्या. त्यांच्या वडिलांचा आणि भावांचा राजकीय कटातून झालेला मृत्यू, तसेच शहाजीराजेंना झालेला अन्याय यामुळे तत्कालीन सत्ताधीशांविषयी त्यांच्या मनात तीव्र असंतोष निर्माण झाला होता. या अनुभवांमधून त्यांनी शिवरायांना अन्यायाचा प्रतिकार करण्याची प्रेरणा दिली.
शिवाजी महाराजांना धर्म, नीतिमत्ता, न्याय आणि प्रजाहितदक्ष राज्यकारभाराचे धडे जिजाऊंनीच दिले. पुण्याच्या जहागिरीत त्यांनी स्वच्छ प्रशासन, न्यायदान आणि शिस्तीची अंमलबजावणी केली. गुंडगिरी, अराजकता आणि अन्यायाला त्यांनी कठोरपणे आळा घातला. त्यामुळे सामान्य जनतेचा विश्वास शिवरायांच्या स्वराज्यावर दृढ झाला.
इतिहासकार आणि विचारवंतांनी जिजाऊंच्या कार्याचा गौरव केला आहे. न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांनी जिजाबाईंना शिवरायांच्या "मार्गदर्शक आणि संरक्षक देवता" असे संबोधले आहे. शिवाजी महाराज स्वतः मातृभक्त होते आणि आईच्या आशीर्वादामुळेच यश मिळते, अशी त्यांची दृढ श्रद्धा होती.
महाराजांच्या अनुपस्थितीत जिजाऊ माँसाहेबांनी स्वराज्याचा कारभार सक्षमपणे सांभाळला. अनेक तंटे सोडविणे, वतन आणि देणग्यांचे निर्णय घेणे यांसारख्या प्रशासकीय जबाबदाऱ्या त्यांनी यशस्वीपणे पार पाडल्या. त्यांच्या पत्रव्यवहारावर 'जिजाऊ वालिदा-ए-राजा शिवाजी' असा शिक्का आढळतो, यावरून त्यांच्या अधिकाराची कल्पना येते.
जिजाऊंच्या प्रेरणेतून शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. जून १६७४ मध्ये रायगडावर झालेल्या राज्याभिषेकाने जिजाऊंचे स्वप्न साकार झाले. आपल्या पुत्राला स्वतंत्र हिंदवी स्वराज्याचा छत्रपती झालेला पाहण्याचे भाग्य या महान मातेला लाभले.
राष्ट्रमाता जिजाऊ या केवळ इतिहासातील व्यक्ती नव्हेत, तर त्या आजच्या आणि भावी पिढ्यांसाठी प्रेरणेचा अखंड स्रोत आहेत. त्यांचे मातृत्व, दूरदृष्टी, प्रशासनकौशल्य आणि राष्ट्रनिष्ठा यामुळेच त्या खऱ्या अर्थाने लोकमाता आणि राष्ट्रमाता ठरतात.

No comments:
Post a Comment