गॅस टंचाईवर मात; एसटी कँटीनमध्ये पेटली चूल - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, June 17, 2026

गॅस टंचाईवर मात; एसटी कँटीनमध्ये पेटली चूल

 गॅस टंचाईवर मात; एसटी कँटीनमध्ये पेटली चूल



सोलापूर (कटूसत्य वृत्त) : गॅस सिलिंडरच्या वाढत्या किमती आणि अपुऱ्या पुरवठ्यामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी सोलापूरच्या मध्यवर्ती बसस्थानकातील कँटीन चालकाने अनोखा उपाय शोधला आहे. कँटीनच्या स्वयंपाकगृहात चूल पेटवून प्रवाशांना चुलीवर तयार केलेला चहा आणि खाद्यपदार्थ पुरविण्यात येत आहेत.

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशात गॅसची टंचाई निर्माण झाली असून सिलिंडरच्या किमतीतही सातत्याने वाढ होत आहे. याचा फटका कँटीन व्यवसायालाही बसला आहे. मात्र, प्रवाशांची गैरसोय होऊ नये आणि खाद्यपदार्थांच्या दरात वाढ टाळता यावी, यासाठी कँटीन चालकाने चुलीचा पर्याय स्वीकारला आहे.

कँटीनच्या स्वयंपाकगृहात तीन दगडांची चूल उभारण्यात आली असून सध्या त्यावरच चहा, नाश्ता आणि इतर खाद्यपदार्थ तयार केले जात आहेत. विशेष म्हणजे, वाढत्या खर्चाचा बोजा ग्राहकांवर टाकण्याऐवजी कँटीन चालकाने खाद्यपदार्थांचे दर पूर्ववत ठेवले आहेत.

मध्यवर्ती बसस्थानकातून दररोज सुमारे दोन हजार बसेसची ये-जा होते, तर ५० हजारांहून अधिक प्रवाशांची वर्दळ असते. अशा परिस्थितीत प्रवाशांना वेळेवर चहा आणि नाश्ता उपलब्ध व्हावा, यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात आले.

कँटीन चालकाच्या या उपक्रमाला तेथे कार्यरत महिला कामगारांनीही पूर्ण सहकार्य दिले असून त्यामुळेच हा पर्याय यशस्वीपणे राबविता आला आहे.

प्रतिक्रिया

"विविध भागांतून येथे प्रवासी येतात. त्यांना चहा किंवा नाश्त्यासाठी अन्यत्र भटकावे लागू नये आणि त्यांची गैरसोय होऊ नये, यासाठी गॅस टंचाईवर मात करत आम्ही स्वयंपाकगृहात चूल पेटवण्याचा निर्णय घेतला. सध्या सर्व खाद्यपदार्थ आणि चहा चुलीवरच तयार करून प्रवाशांना दिला जात आहे."

विजय अवस्थी, कँटीन चालक, मध्यवर्ती बसस्थानक, सोलापूर

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages