जागृत मारूती देवस्थानत हनुमान जन्मोत्सव उत्साहात
४ हजार भाविकांना महाप्रसाद वाटप
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- शेळगी रोड येथील जागृत मारूती देवस्थानच्या वतीने हनुमान जन्मोत्सव मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात साजरा करण्यात आला. पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांची मोठी गर्दी उसळली होती. धार्मिक विधी, सामाजिक उपक्रम आणि महाप्रसाद वितरण अशा विविध कार्यक्रमांनी हा सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.
उत्सवाची सुरुवात पहाटे ५ वाजता पारंपरिक पद्धतीने पाळणा सोहळा आणि मारूतीरायांच्या मूर्तीला अभिषेक करून करण्यात आली. पुराणिक स्वामी यांच्या हस्ते अभिषेक विधी पार पडला. त्यानंतर दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.
या उत्सवाचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे महाप्रसादाचे आयोजन. सुमारे ४ हजार भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. भाविकांनी मोठ्या उत्साहात आणि शिस्तबद्ध पद्धतीने महाप्रसादाचा स्वीकार केला. मंदिर परिसरात दिवसभर भक्तांची वर्दळ कायम होती.
धार्मिक कार्यक्रमासोबतच सामाजिक बांधिलकी जपत रक्तदान शिबिर आणि मोफत आरोग्य तपासणी शिबिराचेही आयोजन करण्यात आले होते. महात्मा बसवेश्वर ब्लड बँक तसेच आधार हॉस्पिटलच्या वैद्यकीय पथकाने या शिबिरात सेवा दिली. अनेक नागरिकांनी रक्तदान करून सामाजिक कर्तव्य पार पाडले, तर शेकडो नागरिकांनी आरोग्य तपासणी करून घेतली. गरजू रुग्णांना मोफत औषधांचेही वितरण करण्यात आले.
संपूर्ण कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी देवस्थानचे ट्रस्टी मल्लिकार्जुन शंकरराव तोटद, विरपाक्ष हुणजे तसेच दीपक बोडा, विश्वनाथ बिडवे, सिद्धाराम यलशेट्टी, प्रवीण इरकशेट्टी, निलेश अंकम, रवी मेळ्ळे आदी कार्यकर्ते आणि भाविकांनी परिश्रम घेतले.
भक्तांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे यंदाचा हनुमान जन्मोत्सव अधिकच भव्य आणि संस्मरणीय ठरल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.


No comments:
Post a Comment