देवडेत आ. अभिजित पाटील यांचा ‘मुक्काम’; शेतकरी, वीज, रस्ते, पाणी प्रश्नांवर थेट चर्चा
पंढरपूर (कटूसत्य वृत्त):- ‘आमदार मुक्कामी; आपल्या गावी’ या अभिनव अभियानांतर्गत देवडे ता. पंढरपूर येथे मुक्काम करून आमदार अभिजीत आबा पाटील यांनी गावकऱ्यांशी थेट संवाद साधला.
गावातील नागरिकांच्या अडीअडचणी जाणून घेतानाच विविध विभागांच्या अधिकाऱ्यांना सोबत ठेवून अनेक प्रश्नांवर जागेवरच तोडगा काढण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यामुळे आमदारांच्या या उपक्रमाला देवडे ग्रामस्थांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या भागातील अनेक नागरिकांना शासकीय कामांसाठी वारंवार तालुका किंवा जिल्ह्याच्या प्रशासकीय कार्यालयात हेलपाटे मारावे लागतात. एखाद्या प्रश्नासाठी महसूल, पंचायत समिती, कृषी, महावितरण, आरोग्य, पोलीस अशा विविध विभागांकडे जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि श्रम खर्च होऊनही अनेक प्रश्न प्रलंबित राहतात. ही अडचण लक्षात घेऊन ‘आमदार मुक्कामी; आपल्या गावी’ अभियानाच्या माध्यमातून सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेलाच थेट गावात आणण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. देवडे येथेही तहसीलदार, पोलीस प्रशासन, गटविकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, ग्रामसेवक, तलाठी, कृषी अधिकारी, महावितरणचे अधिकारी तसेच विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
यावेळी नागरिकांनी मांडलेल्या अनेक प्रश्नांवर संबंधित अधिकाऱ्यांशी थेट चर्चा करण्यात आली. काही समस्या जागेवरच मार्गी लावण्यात आल्या, तर काही प्रश्नांवर संबंधित विभागांना आवश्यक सूचना देऊन पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले. काही नागरिकांना आवश्यक दाखले व प्रमाणपत्रांचे वितरणही करण्यात आले.
शेतकरी, वीज, रस्ते अन् पाण्यापासून घरकुलापर्यंत प्रश्नांचा पाढा
देवडे येथील नागरिकांनी विविध प्रश्न आमदारांसमोर मांडले. यामध्ये शेतकऱ्यांच्या अडचणी, वीजपुरवठा, शेतजमिनींचे बांध, रस्ते, रेशन धान्य, पाणीपुरवठा, गावातील मूलभूत सुविधा, शाळा, घरकुल, आरोग्य सेवा, विविध शासकीय दाखले व प्रमाणपत्रे यांसह अनेक प्रश्नांचा समावेश होता. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची माहिती घेऊन संबंधित अधिकाऱ्यांकडून वस्तुस्थिती जाणून घेण्यात आली. प्रशासन आणि नागरिक यांच्यामधील दरी कमी करून प्रश्नांची थेट सोडवणूक करण्याचा हा प्रयत्न असल्याचे आमदार पाटील यांनी सांगितले.
गावकऱ्यांसोबत जेवण, उशिरापर्यंत हितगुज
या अभियानाचा देवडे येथील हा दुसरा टप्पा असून, आमदार अभिजीत पाटील यांनी केवळ बैठकीपुरता कार्यक्रम न ठेवता गावातीलच मंडळींसोबत जेवण करून उशिरापर्यंत नागरिकांशी मनमोकळा संवाद साधला. गावकऱ्यांच्या सुख-दुःखात सहभागी होत त्यांच्या अडचणी जवळून समजून घेण्याचा प्रयत्न यावेळी करण्यात आला.
“गावकऱ्यांशी झालेली हितगुज, थेट संवाद साधण्याची मिळालेली संधी आणि एखादा प्रश्न मार्गी लागल्यानंतर नागरिकांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान, हीच या अभियानाची खरी ऊर्जा आहे. त्यातूनच आणखी जोमाने काम करण्याचे बळ मिळते,” असे आमदार अभिजीत पाटील यांनी यावेळी सांगितले.
देवडे गावापुरतेच हे अभियान मर्यादित न ठेवता माढा विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक गावात मुक्काम करून नागरिकांच्या समस्या समजून घेण्याचा निर्धार आमदार पाटील यांनी व्यक्त केला. गावात मुक्कामाच्या काळात प्रशासकीय अधिकारीही उपस्थित राहणार असून, नागरिकांच्या समस्या थेट ऐकून त्यावर तत्काळ कार्यवाही करण्याचा प्रयत्न केला जात असुन “प्रशासन गावाच्या दारी” या संकल्पनेला प्रत्यक्ष कृतीची जोड देण्याचा प्रयत्न या अभियानातून होत असल्याने मतदारसंघातील सर्व सामान्य जनतेतुन या अभिनव संकल्पनेचे स्वागत केले जात आहे.
...चौकट...
‘प्रश्नांसाठी लोकांनी माझ्याकडे नव्हे, मीच त्यांच्या दारी जाणार’
राजकारणात लोकप्रतिनिधी आणि नागरिक यांच्यातील थेट संवाद अधिक मजबूत करण्याच्या उद्देशाने हे अभियान राबविण्यात येत असल्याचे आमदार पाटील यांनी स्पष्ट केले. निवडणुकीच्या काळात मतांसाठी गावोगावी जाण्यापेक्षा पाच वर्षांच्या काळात नागरिकांच्या प्रश्नांसाठी त्यांच्या गावात जाणे आणि त्यांच्या समस्या समजून घेणे, ही लोकप्रतिनिधी म्हणून आपली जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले. देवडे येथे या उपक्रमाला मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबद्दल ग्रामस्थ, सहकारी आणि उपस्थित प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मनापासून आभार...
आमदार अभिजीत पाटील
माढा विधानसभा मतदारसंघ
.png)
No comments:
Post a Comment