घरपोच गॅसच द्या; अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

घरपोच गॅसच द्या; अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

 घरपोच गॅसच द्या; अन्यथा कारवाई - जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- गॅस एजन्सींसमोर वाढत असलेली गर्दी आणि घरपोच वितरणात होणारा विलंब लक्षात घेऊन जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी कडक इशारा दिला आहे. गॅस सिलिंडर ग्राहकांच्या घरीच पोहोचवावेत, अन्यथा संबंधित एजन्सींवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात गॅस कंपन्यांच्या प्रतिनिधींसोबत झालेल्या बैठकीत त्यांनी एजन्सींना खडेबोल सुनावले. एजन्सीच्या गोदामासमोर सिलिंडर वाटप करणे टाळावे, तसेच अवैध विक्री आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी बजावले.

दरम्यान, ‘उज्ज्वला’ योजनेतील ग्राहकांना तब्बल ४५ दिवसांनी गॅस मिळत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. तसेच, साडेचार दिवसांत घरपोच वितरणाचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात ८ ते १० दिवस उशीर होत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

एजन्सीसमोरच वाटप; ग्राहकांमध्ये नाराजी
अनेक गॅस एजन्सींनी ‘फक्त घरपोच सेवा’ असे फलक लावले असतानाही प्रत्यक्षात एजन्सीच्या परिसरातच सिलिंडरचे वाटप सुरू असल्याचे दिसून आले. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम आणि नाराजीचे वातावरण आहे. ई-केवायसीसाठीही एजन्सीबाहेर मोठ्या रांगा लागल्याचे चित्र आहे.

१२-१३ दिवस प्रतीक्षा; ग्राहक त्रस्त
शहरातील काही भागांत सिलिंडर बुक केल्यानंतरही १२ ते १३ दिवसांनी गॅस मिळत आहे. घरपोच सेवा अपुरी पडत असल्याने अनेकांना स्वतः एजन्सीकडे जाऊन सिलिंडर घ्यावा लागत आहे. उन्हात तासनतास उभे राहावे लागत असल्याने महिलांसह ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.

अफवांवर विश्वास नको
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी स्पष्ट केले की, राज्यासह सोलापूर जिल्ह्यात पेट्रोल, डिझेल व एलपीजीचा पुरेसा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये आणि घाईघाईने खरेदी करू नये.

या बैठकीस जिल्हा पुरवठा अधिकारी संतोष सरडे, अन्नधान्य वितरण अधिकारी ओंकार पडोळे, तसेच बीपीसीएल, एचपीसीएल व आयओसीएलचे अधिकारी उपस्थित होते.

ग्राहकांची मागणी
ग्राहकांच्या वाढत्या संख्येनुसार अधिक काउंटर सुरू करावेत, वेळेचे नियोजन करावे आणि गॅस वितरण सुरळीत करावे, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages