सोलापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा; विजेत्याला कार, उपविजेत्याला बुलेट
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- निर्झरा केअर फाऊंडेशनतर्फे सोलापुरात २८ व २९ मार्च रोजी चौथ्या महिला महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून विजेत्या कुस्तीपटूला ‘महाराष्ट्र केसरी’ किताब, मानाची गदा आणि किया सोनेट कार देऊन गौरविण्यात येणार आहे. उपविजेत्याला बुलेट दुचाकी देण्यात येणार असून प्रत्येक गटातील सुवर्णपदक विजेत्याला ५१ हजार रुपयांचे रोख बक्षीस देण्यात येणार आहे.
हरिभाई देवकरण प्रशालेच्या मुळे सभागृहात झालेल्या वासा पूजन व माती पूजन सोहळ्यात अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांच्या हस्ते स्पर्धेच्या बक्षिसांचे अनावरण करण्यात आले. यावेळी त्यांनी ही स्पर्धा यशस्वी करून सोलापूरचा नावलौकिक वाढवण्याचे आवाहन केले.
या स्पर्धेत ५० ते ७२ किलोपर्यंत विविध वजनी गट ठेवण्यात आले असून ‘महाराष्ट्र केसरी’ गट ६५ ते ७६ किलो असा असेल. प्रत्येक गटातील पहिल्या तीन विजेत्यांना सुवर्ण, रौप्य व कांस्य पदके देण्यात येणार आहेत.
ही प्रतिष्ठेची स्पर्धा सिद्धेश्वर पेठेतील हरिभाई देवकरण प्रशाला व कनिष्ठ महाविद्यालयाच्या मैदानावर होणार असून राज्यातील ४२ जिल्ह्यांमधून ४०० हून अधिक महिला खेळाडू सहभागी होणार आहेत. तीन वेळा किताब पटकावलेली भाग्यश्री फंड चौथ्यांदा विजेतेपदासाठी सज्ज असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
वडिलांच्या स्मृतीप्रीत्यर्थ उपक्रम
निर्झरा केअर फाऊंडेशनच्या संचालिका स्वाती अळ्ळीमोरे-साखरे यांनी आपल्या वडील ज्येष्ठ कुस्तीपटू सिद्धाराम साखरे यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ या स्पर्धेचे आयोजन केले आहे. महिला कुस्तीपटूंना मोठे व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमास आमदार विजयकुमार देशमुख, महापौर विनायक कोंड्याल, रोहिणी तडवळकर, अस्लम काझी, भरत मेकाले यांच्यासह अनेक मान्यवर व कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment