मोहोळच्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला वेग; ११७ कोटींच्या कामांची टेंडर प्रक्रिया सुरू - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Saturday, August 8, 2026

मोहोळच्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला वेग; ११७ कोटींच्या कामांची टेंडर प्रक्रिया सुरू

 मोहोळच्या आष्टी उपसा सिंचन योजनेच्या तिसऱ्या टप्प्याला वेग; ११७ कोटींच्या कामांची टेंडर प्रक्रिया सुरू

राजन पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश; उत्तर भागातील शेतीला मिळणार मोठा दिलासा




मोहोळ (कटूसत्य वृत्त) :- मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील शेतीला कायमस्वरूपी सिंचनाची सुविधा उपलब्ध करून देणाऱ्या महत्त्वाकांक्षी आष्टी उपसा सिंचन योजना (टप्पा क्र. ३) अंतर्गत विविध विकासकामांसाठी ११७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेला अधिकृतपणे प्रारंभ झाला आहे. या प्रक्रियेमुळे अनेक वर्षांपासून रखडलेल्या या महत्त्वाच्या सिंचन प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असून, तालुक्यात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.

या योजनेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तत्कालीन उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्याचबरोबर महाराष्ट्र राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजन पाटील यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा करून निधी मंजूर करून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. त्यांच्या या अथक प्रयत्नांना अखेर यश आले असून, टेंडर प्रक्रिया सुरू झाल्याने प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामाला लवकरच सुरुवात होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मोहोळ तालुक्याच्या उत्तर भागातील अनेक गावे आजही सिंचनाच्या सुविधेपासून वंचित आहेत. पावसावर अवलंबून असलेल्या शेतीमुळे शेतकऱ्यांना वारंवार आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत आष्टी उपसा सिंचन योजनेचा तिसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात शेतीखालील क्षेत्राला पाणी उपलब्ध होणार असून, कृषी उत्पादनात वाढ होण्यासह शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होणार आहे.

माजी आमदार राजन पाटील यांनी स्वतःच्या राजकीय भवितव्यापेक्षा मोहोळ तालुक्यातील उपेक्षित भागातील जलसिंचनाचा प्रश्न प्राधान्याने हाताळला. शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा करून निधी उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रयत्नांमध्ये माजी आमदार यशवंत माने यांनीही मोठ्या प्रमाणात पाठपुरावा केला असल्याचे सांगण्यात आले.

११७ कोटी रुपयांच्या टेंडर प्रक्रियेला प्रारंभ झाल्याने आता संबंधित कामांची निविदा प्रक्रिया पूर्ण होऊन प्रत्यक्ष कामांना वेग मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. हा प्रकल्प पूर्णत्वास गेल्यानंतर मोहोळ तालुक्यातील उत्तर भागातील शेतीला बारमाही पाण्याचा आधार मिळणार असून, दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यास मोठी मदत होईल. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, या निर्णयाचे सर्व स्तरांतून स्वागत केले जात आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages