उजनी ऑर्चर्ड्स फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड : शून्यातून उभारलेला निर्यातीचा प्रवास - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Friday, April 24, 2026

उजनी ऑर्चर्ड्स फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड : शून्यातून उभारलेला निर्यातीचा प्रवास

 उजनी ऑर्चर्ड्स फार्मर प्रोड्यूसर कंपनी लिमिटेड : शून्यातून उभारलेला निर्यातीचा प्रवास

वाशिंबे(कटूसत्य वृत्त):- सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील वाशिंबे या ग्रामीण भागातून शेतकरी तरुणांनी एकत्री येऊन सुरू केलेली UJANIORCHARDS FARMER PRODUCER COMPANY LIMITED ही आज प्रगती, धैर्य आणि शिस्तबद्ध व्यवस्थापन यांची प्रेरणादायी काहाणी ठरत आहे. २६ एप्रिल २०२५ रोजी शेतकऱ्यांच्या एकत्रित इच्छाशक्तीतून या कंपनीची स्थापना झाली आणि अल्पावधीतच तिने थेट आंतरराष्ट्रीय निर्यातीपर्यंत मजल मारली.
कंपनीची सुरुवात करतानाच एक ठाम भूमिका घेण्यात आली — संपूर्ण कामकाज स्वतःच्या बळावर करायचे. उत्पादनापासून ते निर्यातीपर्यंत कोणत्याही थर्ड पार्टीचा आधार न घेता सर्व प्रक्रिया कंपनीच्या सदस्यांनीच हाताळल्या. “ज्ञान आपल्या हातात असेल तर निर्णय अधिक योग्य आणि वेगवान होतात,” या विश्वासातून ही वाटचाल सुरू झाली.
सुरुवातीला सर्वात मोठे आव्हान होते ते म्हणजे — उत्पादन विकायचे कुठे आणि कसे? टेंभुर्णी परिसरात आधीच मोठ्या बाहेरील कंपन्यांचे मजबूत जाळे असताना नवीन कंपनीसाठी बाजारपेठ निर्माण करणे सोपे नव्हते. मात्र, संयम आणि सातत्य ठेवत चार महिन्यांच्या प्रयत्नांनंतर अधिकृत परदेशी खरेदीदारासोबत करार करण्यात यश आले आणि सप्टेंबर २०२५ मध्ये पहिला कंटेनर ट्रायल बेसिसवर निर्यात करण्यात आला.
पहिलाच प्रयत्न मात्र पूर्णतः यशस्वी ठरला नाही. अपेक्षेपेक्षा जास्त खर्च झाल्याने सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाले. पण याच अपयशातून कंपनीने शिकण्याची संधी घेतली. यशस्वी लोकांच्या कथा ऐकण्याबरोबरच अपयशी ठरलेल्या लोकांचे अनुभव समजून घेतले आणि त्यातील चुका टाळण्यावर भर दिला. याचा परिणाम पुढील प्रवासात स्पष्ट दिसून आला.
उजनी धरणात परिसरात युवा शेतकऱ्यांनी एक नवा इतिहास रचला आहे. आपला माल आपणच विकायचा या हेतूने वाशिंबे ता.करमाळा येथील उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडच्या युवा संचालकांनी किंग बनाना एक्सपोर्ट कंपनीच्या माध्यमातून दर्जेदार केळींची निर्यात करून थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ गाठली आहे. ही कंपनी शेतकरी-मालकीची असून, युवा शेतकरीच्या नेतृत्वाखाली ती कार्यरत आहे. या यशामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये नवीन उत्साह निर्माण केला असून,भारतीय शेतीच्या जागतिक स्तरावरील क्षमतेचा पुरावा मिळाला आहे.
उजनी ऑर्चर्डस फार्मर प्रोड्युसर कंपनी ही एप्रिल २०२५ मध्ये स्थापन झालेली कंपनी असून कामाचे मुख्यालय वाशिंबे, ता. करमाळा, जि. सोलापूर येथे आहे. कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हर्षवर्धन झोळ यांच्या नेतृत्वाखाली युवा शेतकरी संचालकांची टीम कार्यरत आहे. वाशिंबे केळी पिकाच्या उत्पादनात समृद्ध तसेच वेलची केळीचे हब तयार झाले आहे.सर्व तरुण शेतकरी पारंपरिक शेतीतून आधुनिक निर्यात-केंद्रित व्यवसायाकडे वळले आहेत.उजनी धरणाच्या सिंचनामुळे समृद्ध असलेल्या या भागातील काळ्या मातीमध्ये उगवलेल्या कॅव्हेंडिश प्रकारच्या (ग्रँड जैन - जी९, विल्यम्स ) केळींची त्यांनी निर्यात सुरू केली आहे.
कंपनीने किंग बनाना ( King Banana ) हे ब्रँड विकसित केले असून, त्याअंतर्गत केळींची निर्यात होत आहे. ऑक्टोबर आणि नोव्हेंबर २०२५ मध्ये इराक, इराण, सौदी अरेबिया, ओमान,येथे केळींच्या कंटेनर पाठवण्यात आले. या केळींची वैशिष्ट्ये म्हणजे नैसर्गिक गोडवा, १२-२० दिवसांचा शेल्फ लाइफ, १८-२२ सेमी लांबी आणि ३६-४२ मिमी व्यास. दरमहा १२० मेट्रिक टन क्षमता असलेल्या या कंपनीकडे एपीईडीए,एफएसएसएआय आणि अॅगमार्क प्रमाणपत्रे आहेत.
निर्यात प्रक्रियेत शेतापासून जहाजापर्यंत पूर्ण पारदर्शकता आणि शाश्वत पद्धतींचा अवलंब केला जातो. शीतसाखळी, स्वच्छता आणि आंतरराष्ट्रीय मानकांनुसार पॅकेजिंग यामुळे या केळी जागतिक बाजारात लोकप्रिय होत आहेत.अवघ्या २ महिन्यात आतापर्यंत २१ कंटेनर एक्सपोर्ट केले आहे आहेत.
कंपनीच्या वतीने ओमान, दुबई,सोंदी अरेबिया, इराकमध्ये विदेशी दौरे करून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील संपूर्ण माहिती मिळाली आहे.कंपनीचे संचालक  शेतकरी यांची शेतीविषयक माहिती संकलित साठी महाराष्ट्र राज्य शासना मार्फत विदेशी दौऱ्यात निवड झाली आहे. 
अनेक शेतकरीची उच्च दर्जाची केळी घेऊन थेट निर्यात केली, ज्यामुळे चांगला भाव मिळला. शेतकऱ्यांच्या  FPC कंपनीने निर्यात करून यश मिळवले आहे.पुढेही हा प्रवास सुरू राहील.
शेतकरी उत्पादन कंपनी म्हणजे सरकारची योजना नव्हे, तर शेतकऱ्यांच्या हाती सत्ता देणारे साधन आहे.
जर शेतकरी एकत्र आले, योग्य नियोजन करून,दीर्घकालीन दृष्टिकोन ठेवला, तर ग्रामीण भागातूनही मोठे, शाश्वत आणि यशस्वी उद्योग उभे राहू शकतात.
शेतकरीनीं स्वतःवर विश्वास ठेवला, तर शेतीतूनही उद्योग घडतो. टिम किंग बनाना एक्सपोर्ट कंपनीने साध्य करत आहे.
"आम्ही शेतकरी आहोत आणि आमच्या उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देणे हे आमचे ध्येय आहे. उजनी परिसरातील अनेक  शेतकऱ्यांना याचा फायदा होईल.या यशामुळे आमच्या ग्रामीण शेती क्षेत्रात नवीन क्रांतीची सुरुवात झाली आहे. सरकारच्या योजनांच्या मदतीने अशा युवा उद्योजकांना प्रोत्साहन मिळले.
सप्टेंबरमधील अनुभवाच्या आधारे सुधारणा करत ऑक्टोबर पासून निर्यात वाढवण्यात आली आणि त्यानंतर कंपनीने वेगाने प्रगती केली. या सातत्यपूर्ण वाढीमुळे कंपनीने पहिल्याच आर्थिक वर्षात तब्बल पाच कोटी रुपयांचा टर्नओव्हर गाठला.
या प्रवासात कंपनीने केवळ व्यवसायच वाढवला नाही, तर एक शिस्तबद्ध कार्यसंस्कृतीही निर्माण केली. प्रत्येक विभागासाठी स्पष्ट कार्यपद्धती (SOP) तयार करून त्यामध्ये सातत्याने सुधारणा करण्यात आली. संचालक, सदस्य आणि कर्मचारी यांनी आपापल्या जबाबदाऱ्या काटेकोरपणे पार पाडत एक सक्षम संघटना उभी केली.
मात्र, हा प्रवास आव्हानांपासून मुक्त नव्हता. आखाती देशांमध्ये दर घसरणे, हंगामी बाजारातील चढ-उतार आणि अचानक निर्माण झालेल्या परिस्थितींना कंपनीने सामोरे जावे लागले. विशेषतः आखाती देशांमध्ये सुरू झालेल्या युद्धामुळे परिस्थिती गंभीर झाली. त्या वेळी कंपनीचे सात कंटेनर समुद्रात होते, त्यापैकी पाच सुरक्षितपणे पुढे गेले, पण दोन कंटेनर दुबईजवळ अडकले.
केळीसारख्या नाशवंत उत्पादनासाठी हा मोठा धक्का होता. त्याच वेळी, कंपनीने शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळत कोल्ड स्टोरेजमध्ये साठवलेला सुमारे १०० टन मालही हाताळायचा होता. परिस्थिती अधिक बिकट होण्याची शक्यता लक्षात घेऊन कंपनीने एक धाडसी निर्णय घेतला — फूड प्रोसेसिंग क्षेत्रात प्रवेश करण्याचा. तात्काळ फूड प्रोसेसिंग युनिट सुरू करून साठवलेला माल प्रक्रिया करून आणि संभाव्य मोठे नुकसान नियंत्रित करण्याचे काम चालू केले आहे.
हीच ती वेळ होती ज्याने कंपनीचा खरा कस पाहिला आणि तिला अधिक सक्षम बनवले. संकटाला संधीमध्ये बदलण्याची क्षमता या कंपनीने प्रत्यक्षात दाखवून दिली.
आज UJANIORCHARDS FARMER PRODUCER COMPANY LIMITED ही केवळ एक कंपनी नसून ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसाठी एक प्रेरणास्थान ठरली आहे. मर्यादित साधनसामग्री, मोठी स्पर्धा आणि अनपेक्षित संकटे असूनही योग्य नियोजन, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि सामूहिक नेतृत्वाच्या जोरावर कोणतीही उंची गाठता येते, याचे हे उत्तम उदाहरण आहे.
शेतकऱ्यांसाठी सामूहिक कॉर्पोरेट व्यवसायाचे महत्त्व
आजच्या काळात शेतकऱ्यांनी एकत्र येऊन कंपनीच्या माध्यमातून व्यवसाय करणे अत्यंत गरजेचे आहे. सामूहिक पद्धतीने काम केल्यास मोठ्या बाजारपेठेत प्रवेश, योग्य दर आणि नफा मिळवणे सोपे होते. तसेच जोखीम कमी होते आणि मोठ्या कंपन्यांशी स्पर्धा करण्याची ताकद मिळते.
म्हणूनच, संघटित व कॉर्पोरेट पद्धतीने शेती व्यवसाय करणे हेच शेतकऱ्यांच्या प्रगतीचे खरे सूत्र आहे.
भविष्यात अशाच अनेक शेतकरी उत्पादक कंपन्या उभ्या राहाव्यात, त्यांनी थेट बाजारपेठेत उतरून स्वतःची ओळख निर्माण करावी, यासाठी ह्यांची ही यशोगाथा निश्चितच मार्गदर्शक ठरेल.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages