स्वच्छता अधिभाराची वसुली; तरीही बसस्थानकात अस्वच्छताच
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- राज्य परिवहन महामंडळाने १५ एप्रिलपासून प्रवासी तिकिटावर दोन रुपये 'स्वच्छता अधिभार' लागू केला असला, तरी सोलापूर विभागातील अनेक बसस्थानके आणि एसटी बसमध्ये अद्यापही अस्वच्छतेचे चित्र कायम असल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
स्वच्छतेच्या नावाखाली अतिरिक्त शुल्क आकारले जात असताना बसस्थानक परिसरात धूळ, कचरा आणि दुर्गंधीचे साम्राज्य असल्याने प्रवासी संतप्त झाले आहेत.
एसटी महामंडळाकडून प्रत्येक प्रवाशाच्या तिकिटावर दोन रुपये अतिरिक्त आकारले जात आहेत. या निधीतून बसस्थानके आणि बसमध्ये अधिक दर्जेदार स्वच्छता सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र प्रत्यक्षात अनेक बसस्थानकांमध्ये शौचालयांची दयनीय अवस्था असून दुर्गंधीमुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे.
करावा लागत आहे. जागोजागी प्लास्टिक पिशव्या, पाण्याच्या रिकाम्या बाटल्या आणि फळांच्या साली पडलेल्या दिसत आहेत. सोलापूर विभागातील नऊ आगारांमध्ये या अधिभाराची अंमलबजावणी सुरू झाली आहे. उन्हाळी हंगामातील दहा टक्के भाडेवाढ आणि त्यात स्वच्छता अधिभारामुळे सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशाला आर्थिक फटका बसत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
जिल्हाअंतर्गत तसेच लांब पल्ल्याच्या अनेक बसमध्येही साफसफाईचा अभाव दिसून येत आहे. बसमध्ये रिकाम्या पाण्याच्या बाटल्या, प्लास्टिक आणि खाद्यपदार्थांचे कागद पडलेले आढळत असल्याने 'अधिभार घेतला जातोय; पण स्वच्छता कधी होणार?'असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

No comments:
Post a Comment