लोका सांगे ब्रह्मज्ञान स्वत: मात्र कोरडे पाषाण...
मोदींच्या काटकसरीच्या आवाहनाला सोलापूरात हरताळपालकमंत्र्यांच्या बैठकीला 150 गाड्यांची गर्दी
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- इराण-अमेरिका आणि इस्त्राईल संघर्षामुळे जागतिक पातळीवर इंधन व गॅस टंचाईची भीती निर्माण झाली असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचे आणि इंधन बचतीचे आवाहन केले आहे. मात्र, या आवाहनाचा सोलापुरातच फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत झालेल्या आढावा बैठकीसाठी नियोजन भवनासमोर तब्बल १५० हून अधिक चारचाकी वाहनांची गर्दी झाल्याने नागरिकांतून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
जिल्ह्यातील विविध विकासकामे, नियोजन समितीवरील नियुक्त्या आणि आगामी बैठकींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आढावा बैठक आयोजित केली होती. या बैठकीसाठी आमदार, जिल्हा परिषद सदस्य, विविध विभागांचे अधिकारी, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. मात्र, देशभरात इंधन बचतीचा संदेश दिला जात असताना बैठकीच्या ठिकाणी वाहनांचा झालेला प्रचंड ताफा चर्चेचा विषय ठरला.
विशेष म्हणजे, सोलापूर जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा शुक्रवारी (ता. १५) होणार असून २२ मे रोजी नियोजन समितीची बैठक पार पडणार आहे. या बैठकीपूर्वीच इंधन बचतीचे प्रत्यक्ष उदाहरण लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने घालून द्यावे, अशी मागणी समर्थ सोलापूर कृती समितीने केली आहे. “जनतेला काटकसर सांगणाऱ्यांनी स्वतःपासून सुरुवात करावी,” अशी प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे.
बैठकीदरम्यान नियोजन समितीवर पालकमंत्र्यांच्या कोट्यातून संधी मिळावी यासाठी इच्छुकांची मोठी गर्दी झाली होती. अनेक आमदार, पदाधिकारी आणि विविध पक्षांचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने उपस्थित राहिल्याने नियोजन भवन परिसर वाहनांनी फुलून गेला होता.
कोणाची किती वाहने?
पालकमंत्री जयकुमार गोरे : ०८ वाहने (शासकीय ताफ्यासह)
आमदार व पदाधिकारी : ३० वाहने
विविध पक्षांचे कार्यकर्ते : ५० वाहने
विभागप्रमुख व अधिकारी : २५ वाहने
इतर वाहने : २५
एकूण वाहनांची संख्या १५० च्या पुढे गेल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान, या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन देशहितासाठी असल्याचे सांगितले. “प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि नागरिकांनी इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा. अधिकाऱ्यांनी कमीत कमी इंधन वापरावर भर द्यावा. देशहित डोळ्यासमोर ठेवून सर्वांनी जबाबदारीने वागणे आवश्यक आहे,” असे त्यांनी म्हटले.
दुसरीकडे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस यांनीही इंधन बचतीसाठी प्रशासन स्वतंत्र परिपत्रक काढणार असल्याची माहिती दिली. “सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक वाहनांचा वापर कमी करून एकाच वाहनातून प्रवास करावा. सार्वजनिक वाहतुकीचा वापर वाढवावा. बैठका आणि दौऱ्यांमध्येही इंधन बचतीला प्राधान्य देण्यात येईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र, प्रत्यक्षात सोलापुरातील सार्वजनिक प्रवासी व्यवस्थेची दयनीय अवस्था असल्याने नागरिकांकडूनही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शहरासाठी १०० ई-बसेस मंजूर झाल्याची घोषणा दीड वर्षांपूर्वी करण्यात आली होती. पहिल्या टप्प्यात ४० बसेस येणार असल्याचे सांगण्यात आले होते. त्यासाठी महापालिका आणि महावितरणकडून आवश्यक सुविधा उभारण्यात आल्याचा दावा करण्यात आला. मात्र, तांत्रिक कारणांमुळे अद्याप एकही नवी बस शहराच्या सेवेत दाखल झालेली नाही.
सध्या महापालिका परिवहनच्या केवळ २२ बसेस उपलब्ध असून त्यापैकी फक्त १८ बसेस प्रत्यक्ष मार्गावर धावत आहेत. शहरातील पाच आणि ग्रामीण भागातील तेरा मार्गांवर या बसेस सेवा देत आहेत. दुसरीकडे शहरात तब्बल १५ हजार रिक्षा धावत असल्याने खासगी वाहनांवरील अवलंबित्व वाढले आहे.
एका बाजूला इंधन बचतीचे आवाहन, तर दुसऱ्या बाजूला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची अपुरी क्षमता आणि मंत्र्यांच्या बैठकीत वाहनांची झालेली प्रचंड गर्दी यामुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. “काटकसर जनतेसाठीच की सत्ताधाऱ्यांसाठीही?” असा सवाल आता सोलापूरकरांकडून उपस्थित केला जात आहे.
.jpg)
No comments:
Post a Comment