डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 21 लाखांची फसवणूक; आरोपी जेरबंद - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Thursday, March 26, 2026

डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 21 लाखांची फसवणूक; आरोपी जेरबंद

 डिजिटल अरेस्टची भीती दाखवून 21 लाखांची फसवणूक; आरोपी जेरबंद




सोलापूर (कटूसत्य वृत्त):- पोलिस असल्याची बतावणी करून ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत सोलापुरातील एका वृद्धाची 21 लाख 25 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दिल्लीतील सायबर गुन्हेगारास सोलापूर शहर सायबर पोलिसांनी अटक केली आहे. राघवेंद्रसिंग पिता मुलचंद (वय 38, रा. हायटेंशन रोड, कपासहेडा, नवी दिल्ली) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून त्याच्याकडून गुन्ह्यातील सुमारे साडेनऊ लाख रुपयांची रक्कम जप्त करण्यात आली आहे.

या प्रकरणात आरोपीने स्वतःला कुलाबा पोलिस ठाण्यातील सब-इन्स्पेक्टर असल्याचे भासवून संबंधित वृद्धाला मनी लॉन्डरिंगच्या गुन्ह्यात अडकवल्याची खोटी माहिती दिली. त्यानंतर ‘डिजिटल अरेस्ट’ची भीती दाखवत त्याच्याकडून टप्प्याटप्प्याने 21 लाख 25 हजार रुपये ट्रान्स्फर करून घेतले.

फसवणूक झाल्याची तक्रार प्राप्त होताच सोलापूर सायबर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर तज्ज्ञ पथकाने दिल्लीत धडक कारवाई करत 17 मार्च रोजी आरोपीला अटक केली. चौकशीत आरोपीने साथीदारासह गुन्हा केल्याची कबुली दिली.

ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉ. अश्विनी पाटील, सहायक पोलीस आयुक्त राजन माने यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. या मोहिमेत वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा, पोलीस उपनिरीक्षक नागेश इंगळे, प्रवीण भोपळे, गंगावणे, कृष्णात जाधव, प्रकाश गायकवाड, मच्छिंद्र राठोड, रतिकांत राजमाने यांनी सहभाग घेतला.

सावधगिरीचे आवाहन
डिजिटल अरेस्टचा संशय आल्यास तत्काळ पोलिसांशी संपर्क साधावा, अनोळखी व्हिडिओ कॉल स्वीकारू नयेत तसेच मोबाईलमधील आर्थिक व्यवहाराशी संबंधित अ‍ॅप्सचे पिन, पासवर्ड कोणालाही देऊ नयेत, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्रीशैल गजा यांनी केले आहे.


No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages