सोलापूर ऊर्जा प्रकल्प ठाम; ६,६०० मिलियन युनिटचे उद्दिष्ट कायम
दक्षिण सोलापूर (कटूसत्य वृत्त):- जागतिक पातळीवरील तणाव आणि युद्धजन्य परिस्थितीचा सोलापूर औष्णिक ऊर्जा प्रकल्पाच्या वीज निर्मितीवर कोणताही परिणाम झालेला नसल्याचा निर्वाळा प्रकल्पाचे मुख्य व्यवस्थापक एम. के. बेबी यांनी दिला. चालू वर्षअखेरपर्यंत ६,६०० मिलियन युनिट वीज निर्मितीचे उद्दिष्ट असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
चालू आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये (फेब्रुवारी अखेरपर्यंत) प्रकल्पाने ५६.४४ टक्के प्लांट लोड फॅक्टर (PLF) सह ५,९७१ मिलियन युनिट वीज निर्मिती केली आहे. आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत ही निर्मिती सुमारे ६,६०० मिलियन युनिटपर्यंत पोहोचण्याची अपेक्षा आहे.
कोळसा पुरवठ्याबाबतही प्रकल्पाने चांगली कामगिरी केली असून, २०२३-२४ मधील ४७.०९ लाख मेट्रिक टन या विक्रमी प्राप्तीमध्ये सुधारणा झाली आहे. चालू वर्षात फेब्रुवारी अखेरपर्यंत ४६.७२ लाख मेट्रिक टन कोळसा मिळाला असून, वर्षअखेरपर्यंत ५० लाख मेट्रिक टनपेक्षा अधिक कोळसा प्राप्त होण्याची शक्यता असल्याची माहिती प्रकल्प प्रमुख बीजेसी शास्त्री यांनी पत्रकार परिषदेत दिली.
२५ सप्टेंबर २०१७ पासून कार्यरत असलेला सोलापूर सुपर थर्मल पॉवर प्रकल्प हा एनटीपीसीच्या आधुनिक प्रकल्पांपैकी एक असून महाराष्ट्रासह मध्य प्रदेश, छत्तीसगड, गुजरात, गोवा तसेच दादरा-नगर हवेली आणि दमण-दीव या राज्यांच्या वीज गरजा भागवण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे.
औष्णिक वीज निर्मितीबरोबरच प्रकल्पाने नवीकरणीय ऊर्जेकडेही पाऊल टाकले असून २३ मेगावॅट क्षमतेचा सौर ऊर्जा प्रकल्प कार्यान्वित केला आहे.
नेट झिरोकडे वाटचाल
पर्यावरण संवर्धनासाठी प्रकल्पात झिरो लिक्विड डिस्चार्ज आणि रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रणाली राबविण्यात येत आहेत. ऊर्जा, पाणी आणि कचरा व्यवस्थापनात ‘नेट झिरो’ साध्य करण्याच्या दिशेने प्रकल्प प्रयत्नशील असून, १.८ मेगावॅट क्षमतेच्या सौर पीव्ही प्रकल्पाचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.या पत्रकार परिषदेला सुभाषित बंदोपाध्याय, एचआर व्यवस्थापक कन्हैया दास आदी उपस्थित होते.
.png)
No comments:
Post a Comment