आदिला नदीचे अस्तित्व टिकलेच पाहिजे- महापौर विनायक कोंड्याल
सोलापूर (कटूसत्य वृत्त):- सोलापूर शहरातील आदिला नदीचे अस्तित्व टिकलेच पाहिजे. मी या नदीला नाला म्हणालोच नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला.सोलापूर मधील आदिला नदीचे अस्तित्व कायमस्वरूपी टिकलेच पाहिजे. शहरातून नदी जात असेल तर आम्हाला अभिमानच आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा आपला प्रयत्न नाही, या ठिकाणी किमान नाल्यासारखी खोदाई केली असती तर पाण्याचा निचरा झाला असता असे मी म्हटले होते, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
सोलापूर श्रमिक पत्रकार संघातर्फे आयोजित वार्तालाप कार्यक्रमात ते बोलत होते. एवढे त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. यावेळी संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे, सरचिटणीस सागर सुरवसे, खजिनदार किरण बनसोडे आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी महापौर विनायक कोंड्याल यांनी गेल्या 25 दिवसातील कामकाज आणि कार्याचा आढावा सांगितला. ते पुढे म्हणाले की, आदीला नदीसंदर्भात घेतलेल्या बैठकीवेळी पाटबंधारे विभागाकडे माहिती उपलब्ध नव्हती. या नदीच्या सीमांकनाचे काम करावे अशी मागणी आपण केली असून ते दोन महिन्यात करण्यात येईल असे पाटबंधारे विभागाने सांगितले आहे. या नदीच्या परिसरात प्लॉटिंग, बांधकामे आदीसंदर्भात बेकायदेशीर कामे झाली असतील, तर त्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी आपली भूमिका आहे. या परिसरात विकासकामांमध्ये ज्यांच्या जमिनी जात असतील, तर अशांना शासनाकडून मोबदला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. याप्रकरणी कोणालाही पाठीशी घालण्याचा आपला प्रयत्न नाही, असेही महापौरांनी स्पष्ट केले. या ठिकाणी किमान नाल्यासारखे खोदाई केली असती तर पाण्याचा निचरा झाला असता, असे मी म्हटले होते. सुपर टॅक्स कमी करण्यासाठी विषय प्रशासकीय स्तरावर मंजूर केला आहे मात्र त्याची अंमलबजावणी करण्यात आली नाही. तोही विषय प्रशासनाकडून मागविण्यात आला आहे.
सोलापुरातील 50 पैकी 14 स्मशानभूमीचे सुशोभीकरण स्मार्ट सिटी निधीतून करण्यात आले आहे. त्या कामांची ऑन द स्पॉट पाहणी करण्यात येणार आहे.
सोलापूर शहरातील धूळ मुक्तीसाठी आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी स्वीपर मशीन वापरण्यात येत आहे. मुख्य रस्त्यावरील धुळीचे प्रमाण निश्चितच कमी होत आहे. श्री सिद्धेश्वर तलावातील मासे ऑक्सिजन अभावी मृत पावले ही बाब लक्षात घेऊन डीपीडीसी फंडातून दीड कोटी रुपये मिळवून यातून फाउंटन मशीन खरेदी करण्यात येणार आहे. एकूण आठ मशीन लागणार असून यापैकी दोन मशीन सिद्धेश्वर देवस्थान खरेदी करणार आहे. उजनी धरणात अपायकारक गोष्टी मिसळले जात असल्याचा मुद्दा निदर्शनास आला आहे. या अपायकारक गोष्टींना प्रतिबंध करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून शासनाला कळविण्यात येणार आहे तसेच फिल्टरायजेशनची सोयदेखील करण्याचा प्रयत्न आहे, असे महापौर म्हणाले.
सोलापूर शहरातील परिवहन सेवा सुधारण्यासाठी 100 ई बसेस लवकरच उपलब्ध होणार आहेत. ज्या मार्गावर बसेस सेवा उत्तमरीत्या सुरू राहू शकेल, अशा ठिकाणी सेवा दिली जाईल. शहरातील रस्ता दुभाजकांमधील झाडे जगवण्यासाठी सामाजिक संस्थांना काम देण्याचा प्रयत्न आहे, असेही महापौरांनी सांगितले.
प्रारंभी स्वागत आणि सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी तर प्रास्ताविक सागर सुरवसे यांनी केले. आभार उपाध्यक्ष आफताब शेख यांनी मानले. यावेळी विविध वृत्तपत्र व चॅनलचे पत्रकार, कॅमेरामन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शहराला दोन दिवसाआड पाणीपुरवठ्यासाठी प्रयत्न
सोलापुरात सध्या तीन ते चार दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. ते किमान दोन दिवसाआड करावे,या दृष्टीने आपले प्रयत्न आहेत. यासंदर्भात स्पॉट व्हिजिट करून तसेच निवृत्त अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन घेऊन यातून मार्ग काढण्याबाबत आपला प्राधान्यक्रम असेल. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अनुभवी निवृत्त अधिकाऱ्यांना सेवेत संधी देण्यात येणार आहे, असे महापौर विनायक कोंड्याल यांनी स्पष्ट केले.
बी 2 ,गुंठेवारीचा प्रश्न मार्गी लागल्यानंतर उत्पन्न वाढणार
सोलापूर शहरातील बी 2 चा प्रश्न मार्गी
लागण्यासाठी महापालिकेने ठराव करून शासनाकडे पाठवला आहे. याच पद्धतीने गुंठेवारी नियमित करून नागरिकांच्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे. गुंठेवारीचा प्रश्न सुटल्यास महानगरपालिकेचे उत्पन्नही वाढणार आहे, असेही महापौर कोंड्याल म्हणाले.
सुधारित आकृतीबंध, लाडकमिटी प्रतीक्षा यादी संदर्भात प्रशासनाला सूचना
सोलापूर महापालिकेचा सुधारित आकृतीबंध आणि लाड कमिटी अंतर्गत प्रतिक्षा यादीतील नियुक्ती आदेश या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या आहेत त्याचबरोबर मंत्रालय स्तरावरही शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे महापौर यांनी सांगितले.
.png)
No comments:
Post a Comment