रसवंती सुरू, उन्हाच्या झळांत उसाच्या रसाचा गोडवा - Katusatyanews.com :

Subscribe Us

Breaking

Home Top Ad

Post Top Ad

Wednesday, March 4, 2026

रसवंती सुरू, उन्हाच्या झळांत उसाच्या रसाचा गोडवा

 रसवंती सुरू, उन्हाच्या झळांत उसाच्या रसाचा गोडवा




गार उसाच्या रसाला नागरिकांची पसंती

बार्शी (कटूसत्य वृत्त):- उन्हाळ्याच्या कडक झळांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना आता उसाच्या ताज्या रसाचा गोडवा दिलासा देताना दिसत आहे. तापमानात वाढ होताच शहरासह ग्रामीण भागात रसवंती गृहांची लगबग वाढली असून गार उसाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
उन्हाळ्याच्या दिवसांत शरीरातील पाण्याची कमतरता भरून काढण्यासाठी उसाचा रस अत्यंत उपयुक्त मानला जातो. उसाचा गार रस पिल्याने शरीराला ऊर्जा मिळते आणि ताजेतवाने वाटते. त्यामुळे लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वजण आवडीने उसाचा रस पिताना दिसत आहेत.
शहरातील विविध चौकात आणि रस्त्याच्या कडेला उभारण्यात आलेल्या रसवंती गृहातून येणारा घुंगरांचा छनछनाट रस्त्यावरून जाणाऱ्या नागरिकांचे लक्ष वेधून घेतो. अनेकजण कुटुंबासह थांबून लिंबू आणि आले घातलेल्या गार उसाच्या रसाचा आनंद घेत आहेत.
दरम्यान, हा व्यवसाय कमी भांडवलात सुरू करता येत असल्याने अनेक शेतकरी आणि तरुणांनीही रसवंती गृह सुरू केले आहेत. ऊस साखर कारखान्याला देण्याऐवजी काही शेतकरी स्वतः उसाचा रस काढून विक्री करत असून त्यातून चांगले उत्पन्न मिळत असल्याचे दिसून येत आहे.
पूर्वी बैलाच्या घाण्याच्या साहाय्याने उसाचा रस काढला जात असे. त्या वेळी बैलांच्या गळ्यात घुंगरू बांधले जात. आज आधुनिक यंत्राद्वारे रस काढला जात असला तरी त्या परंपरेची आठवण जपण्यासाठी आणि ग्राहकांचे लक्ष वेधण्यासाठी मशीनलाही घुंगरू बांधण्याची पद्धत अजूनही कायम आहे.
उन्हाळ्याच्या वाढत्या उष्णतेमध्ये उसाच्या रसाचा गोडवा नागरिकांना दिलासा देत असून रसवंती गृहातील घुंगरांचा आवाज पुन्हा एकदा शहरातील रस्त्यांवर घुमताना दिसत आहे.

No comments:

Post a Comment

Post Bottom Ad

Pages