अकलूजचा ऋतुराज रास्ते घुमवणार अमेरिकेत मराठी लोककलेचा डंका
अकलूज (कटूसत्य वृत्त):- अकलूजच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरेचा वारसा जपत अकलूजचा सुपुत्र, सदाशिवराव माने विद्यालयाच्या, माजी विद्यार्थ्याने यशोशिखरावर गवसणी घातली आहे. ऋतुराज सुधीर रास्ते हा कलाकार आता ‘द फोक आख्यान’ या महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशात गाजत असलेल्या, विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाच्या माध्यमातून मुख्य 4 वादकापैकी एक म्हणून थेट, अमेरिकेत महाराष्ट्राची लोककला आणि संगीत सादर करून अकलूजचे नाव सातासमुद्रापार उज्ज्वल करणार आहे.
ऋतुराजने आपले प्राथमिक व माध्यमिक शिक्षण अकलूज येथील सदाशिवराव माने विद्यालयात पूर्ण केले. पहिलीत असल्यापासूनच त्याला संगीताची आवड होती. शालेय जीवनात विविध स्पर्धांमध्ये तसेच सदाशिवराव माने विद्यालयाच्या संगीत समूहात सक्रीय सहभाग नोंदवत त्याने संगीतातील बारकावे आत्मसात केले. संगीताचे खऱ्या अर्थाने प्राथमिक आणि पायाभूत धडे अर्थात "बाळकडू" त्याला सदाशिवराव माने विद्यालयातच मिळाले.
संस्थेचे अध्यक्ष जयसिंह मोहिते - पाटील यांचे प्रोत्साहन, तसेच प्राथमिकच्या मुख्याध्यापिका जाधव मॅडम,माध्यमिकचे मुख्याध्यापक प्रताप पाटील, संगीत शिक्षक झांबरे, यांचे योग्य मार्गदर्शन मिळाल्यामुळे माझा वादन कलेचा पाया मजबूत झाला असे ऋतुराज रास्ते यांनी सांगीतले .
संगीताची कला जोपासत ऋतुराजने शिक्षणातही मोठी मजल मारली. कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय (शिवाजी विद्यापीठ) येथून B.Sc. (Agri) पूर्ण केल्यानंतर, त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात M.Sc. साठी
शिक्षण घेत असतानाच त्याने संगीत क्षेत्रातील आपले प्रभुत्व सिद्ध केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्रतिनिधित्व करताना त्याने आंतरराज्य, विभागीय, राज्यस्तरीय आणि केंद्रीय स्तरावरील अनेक प्रतिष्ठित संगीत स्पर्धांमध्ये विजेतेपद पटकावून आपल्या वादन कौशल्याची छाप पाडली.
राहुरी विद्यापीठा मध्ये इंद्रधनुष्य व नॅशनल स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून काम करत असताना गुजरात, बंगलोर, येथील स्पर्धेत 2रे विजेतेपद मिळवून दिले.
लोककलेतील ताल वाद्यातील सर्व प्रकारचे वाद्य तो सहजपणे उत्कृष्ट प्रकारे लयबद्ध वाजवण्याची कला त्याने आत्मसात केली आहे.
महाराष्ट्रातील अस्सल लोककला, लोकसंगीत आणि पारंपरिक आख्यानशैली यांचा मिलाफ असलेल्या ‘द फोक आख्यान’ या शोच्या माध्यमातून मुख्य वादक म्हणून ऋतुराज अमेरिकेतील विविध 6 प्रमुख शहरांमध्ये आपली कला सादर करणार आहे. अकलूजच्या मातीत घडलेला हा कलाकार आज आंतरराष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राच्या लोककलेचे प्रतिनिधित्व करत असल्याने संपूर्ण अकलूज शहरात अभिमानाचे वातावरण असून ऋतुराजवर कौतुकाचा वर्षाव होत असून,अमेरिकेतील या दौऱ्यासाठी त्याला उदंड शुभेच्छा दिल्या जात आहेत.
.png)
No comments:
Post a Comment